शेअर बाजारात पैशांचे आमिष दाखविणाऱ्या टोळीला अटक

'प्रॉफिट'चे आमिष दाखवून फसविणाऱ्या आठजण अटकेत

पनवेल,( दादासाहेब येंधे) : शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पनवेल सायबर सेलच्या पथकाने बंगळुरू, इंदौर या ठिकाणी छापे टाकून आठजणांना ताब्यात घेतले आहे. तसेच अधिक तपास करण्यासाठी १४ संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. ऑनलाइन फसवणुकीसाठी या टोळीने २५ बनावट वेबसाईट बनवल्याचे निष्पन्न झाले असून इंदौर येथील अपोलो टॉवर्समधील कॉलसेंटरवर धाड टाकून चार लॅपटॉप, सात मोबाईल, २० सीम कार्डसह इतर साहित्य जप्त केले आहे.

'एफ.एम. ट्रेडर्स' कंपनीचा एक्झिक्युटिव्ह अकाऊंट डिपार्टमेंट हेड असल्याचे सांगून दोन महिन्यांपूर्वी पनवेलमधील एका व्यक्तीकडून तब्बल २१ लाख ७१ हजार रुपये उकळण्यात आले होते. याबाबत कामोठे पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ऑनलाइन फसवणुकीची गंभीर दखल घेत या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आदेशाने हा गुन्हा ईएमसी सायबर सेल यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या सेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्यातील बँक व्यवहार व तांत्रिक विश्लेषण करून बंगळुरू व इंदौर येथे छापे टाकून आठ आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक केलेल्या टोळीविरोधात बंगळुरू शहर, तेलंगणा, तामीळनाडू, राजस्थान, नवी मुंबई, पुणे येथील पोलीस ठाण्यात याआधी देखील गुन्हे दाखल आहेत. या टोळीने इंदौर येथे कार्यालय थाटून ही फसवाफसवी सुरू केली होती. पोलीस निरीक्षक दीपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा छडा लागल्यानंतर फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँकांमधील ६ लाख ७ हजार ८५६ रुपयांची खाती गोठवण्यात आली. 

संबंधित पोस्ट