कळंबोली वाहतूक शाखेकडून खांदेश्वर रेल्वे स्थानक रिक्षा नाक्यावर प्रबोधन
- by Reporter
- May 29, 2023
- 265 views
पनवेल - रिक्षा चालकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. त्या पार्श्वभूमीवर अगोदर प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने कळंबोली वाहतूक शाखेने खांदेश्वर रेल्वे स्थानका समोरील रिक्षा नाक्यावर चालकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले. त्याची पायमल्ली केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा वजा समज सुद्धा यावेळी देण्यात आली.
पनवेल परिसरात रिक्षा मीटर प्रमाणे चालाव्यात यासाठी वारंवार आंदोलने झाली. त्याचबरोबर प्रवाशांची ही कायम आग्रही मागणी राहिली. पनवेल संघर्ष समिती सह इतर सामाजिक संस्थांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेतला. आरटीओ वाहतूक विभागानेही विशेष प्रयत्न केले. इतकेच नाही तर कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय काही रिक्षाचालकांकडून इतर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत . नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणाबरोबरच वाहतूक नियमाला एक प्रकारे शिस्त लागली आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण सुद्धा कमी झाले. रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियमांचे तंतोतंत पालन करावा या अनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखांच्या वतीने जनजागृती आणि प्रबोधन केले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या रिक्षा नाक्यावर चालकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करण्यात आली. मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्याबाबत सुद्धा सूचना करण्यात आल्या. कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी हरिभाऊ बनकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत शिर्के,शैलेश भद्रे यांनी रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले. वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांना सूचना वजा इशारा!
रिपोर्टर