गावाखेड्यातून संविधान जनजागृतीची गरज - नंदेश उमप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुबंई सर्वोदय मंडळ गांधी बुक सेंटर, नाना चौक, ग्रँटरोड, मुंबई येथे संकल्प संस्था, मैत्री संस्था आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली अमृत महोत्सव व भारतीय संविधान दिनानिमित्त "संविधान" विषयावर खुली राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा व संविधान गौरव दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन नंदेश विठ्ठल उमप (महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व शाहीर) तसेच प्रमुख अतिथी वर्षाताई विद्या विलास (महिला हक्क कार्यकर्त्या), जयश्री (माई) सावर्डेकर (सामाजिक कार्यकर्त्या), विशाल हिवाळे (संयोजक संविधान हक्क परिषद), बजरंग सोनावणे (नाट्य प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते), मकरंद वागणेकर (ज्येष्ठ कवी) यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. 

कार्यक्रमाचे आयोजक व मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज  भोईर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या काव्य स्पर्धेत राज्यातून १३९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. परंतु, कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे या स्पर्धकांमधून अंतीम फेरीच्या सादरीकरणासाठी केवळ ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.  

संविधान विषयावरच्या काव्य स्पर्धेच्या नंतर झालेल्या सत्काराला उत्तर देताना सुप्रसिद्ध गायक आणि शाहिर नंदेश उमप म्हणाले, "संविधाना बद्दल कवींनी इतकं काही मांडल्यानंतर मी वेगळं काय सांगू? एक कोणीतरी असतं जो वेगळं काहीतरी करत असतो, ते वेगळं म्हणजे "चिंतन" असतं. चिंतन आपल्याला ह्या गोष्टीचं करायचंय की, संविधानाच्या प्रती जाळल्या जात आहेत, संविधानाचा र्‍हास होतोय की संविधानाबद्दल अजून काही वेगळं बोललं जातंय? कोणी एक रेघ आखली असताना ती न खोडता त्यापुढे एक मोठी रेघ ओढायची ताकद आपल्याला संविधानाने दिली आहे. भारताच्या भूभागावर एकोप्याने नांदायची संधी आपल्याला संविधानाने दिली आहे. विचारांची देवाणघेवाणच दोन भिन्न समुदायातील दरी दूर करू शकते. संविधाना मुळे मुका बोलू लागला, आंधळा बघू लागला, बहिरा ऐकू लागला, पांगळा चालू लागला. त्यासाठी तुमच्या सारख्या कवींच्या शब्दांना आमच्या सारख्यांच्या सुरांची सोबत लाभली तर लाखोंच्या समुदायाचं विचार परिवर्तन करायची ताकत निर्माण होऊ शकते. त्यासाठी गावाखेड्यातून संविधान जनजागृतीची गरज आहे."

अनघा संजय जाधव, अनिल जयवंत शिंदे, छाया संजय पाटील, डॉ. संतोष शिवाजी कांबळे, निखिल मोंडूळे, प्रकाश तुकाराम जाधव, प्रदीप भरत जानकर, रत्नप्रभा मारुती मोरवे, राजेंद्र मधुकर सावंत, रिया रूपेश पवार, सायली कासारे, श्रद्धा कमळाकर पौडवाल, संपदा राजेश देशपांडे आणि सुलभा प्रकाश कुलकर्णी या स्पर्धकांमध्ये अंतिम ३ क्रमांकांसाठी कमालीची चुरस झाली. पत्रकार कवी अनुज केसरकर आणि शिक्षिका कवयित्री मनीषा (चव्हाण) कंग्राळकर या परीक्षकांनी प्रथम क्रमांक अनघा संजय जाधव, द्वितीय क्रमांक राजेंद्र मधुकर सावंत, तृतीय क्रमांक सायली कासारे यांच्या काव्यांची निवड केली. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. 

राजेश जाधव यांनी सरनामा वाचन केले. कार्यक्रमाचे आयोजक संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी आभारप्रदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजेश जाधव, विनायक जावळेकर, कपिल श्रीरसागर, संतोष भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित पोस्ट