मलेशियाच्या सुलतानांनी घेतली पालिका उद्यानांच्या कामाची दखल

मुंबई,दि. १२(अल्पेश म्हात्रे)   मुंबई महापालिकेच्या उद्यानांची थेट मलेशियाच्या सुलतानांनी दखल घेतली आहे. मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह यांनी पालिका उद्यानांच्या कामाची दखल घेतली. तसेच मुंबईत वृक्षांची कशी काळजी घेतात आणि उद्यानांची कशी देखभाल करतात याचा अभ्यास करण्यासाठी थेट त्यांच्या वाणिज्यदूतांना थेट मुंबईत पाठवले. या वाणिज्यदूतांनी थेट उद्यानात जाऊन पालिकेच्या कामांची पाहणी केली आणि पालिकेच्या वृक्ष संवर्धनाच्या तंत्राचाही अभ्यास केला.   

मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह यांनी पालिका उद्यानांची दखल घेतली असून   त्यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईला भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांना मुंबईतील सार्वजनिक परिसरातील वृक्षांच्या खोडांना तांबड्या व पांढऱ्या रंगाचे वैशिष्टपूर्ण लेपन दिल्याचे आढळून आले. या मागे निश्चितच शास्त्रीय कारण असेल, असा अंदाज बांधून त्यांनी मलेशियात परत गेल्यानंतर मलेशियाच्या वाणिज्य दूतांना यामागील कारणांची माहिती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत जैनल अजलान मोहम्मद नादजिर यांनी नुकतीच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथील महापालिकेच्या उद्यान विभागास भेट देऊन झाडांना रंग देण्याची कारणे, पद्धती व प्रक्रिया जाणून घेतली. तसेच मुंबईच्या धर्तीवर मलेशियातील झाडांना देखील गेरु व चुन्याचे लेपन देणार असल्याचेही त्यांनी चर्चेदरम्यान नमूद केले.

रंगाचं रहस्य जाणून घेतलं

महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परेदशी यांच्यासह महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तसेच मलेशियाच्या वाणिज्य दूतावासाशी संबंधित कर्मचारी देखील उपस्थित होते. या भेटी दरम्यान जितेंद्र परदेशी यांनी वाणिज्य दूत जैनल अजलान मोहम्मद नादजीर यांना सांगितले की, वृक्षांच्या खोडांना देण्यात येत असलेला तांबडा व पांढरा रंग हे अनुक्रमे गेरु व चुन्याचे लेपन असते. यामुळे बुरशीपासून व किडींपासून वृक्षाचा बचाव होतो.

याचबरोबर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील नादजीर यांना या भेटीदरम्यान देण्यात आली. यावेळी नादजीर यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कामांचे कौतुक केले. तसेच त्यांनी याप्रसंगी मलेशियातील उद्यानांची माहिती देणारे एक पुस्तक महापालिकेच्या उद्यान विभागाला भेट स्वरुपात दिले. तर उद्यान विभागाद्वारे ‘फायकस’ या प्रकारातील बटुवृक्ष (बोनसाय) नादजीर यांना भेट स्वरुपात देण्यात आला.

झाडांच्या खोडांना का दिला जातो गेरु व चुन्याचा रंग?

गेरुमध्ये अम्लीय गुणधर्म  असतात. तर चुन्यामध्ये अल्कधर्मी गुणधर्म  असतात. गेरु व चुना या दोन्ही बाबी झाडाच्या खोडाला सुयोग्यप्रकारे लावल्यास अशा झाडांना बुरशीपासून प्रतिबंध होण्यास मदत होते.

 ज्या भागात अधिक पाऊस पडतो, अशा ठिकाणी झाडांना बुरशी लागण्याची संभाव्यता अधिक असते. त्यामुळे मुंबईसारख्या तुलनेने अधिक पावसाच्या परिसरातही झाडांना बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते. ही बुरशी लागू नये यासाठी अम्लीय गुणधर्म असणारा गेरु हा झाडाच्या खोडाच्या खालच्या बाजूला, तर त्यावर अल्कधर्मी गुणधर्म असणारा चुना लावला जातो.

झाडांना लागणा-या बुरशीचे विविध प्रकार आहेत. यापैकी काही प्रकारातील बुरशीला गेरुमुळे अटकाव होतो. तर काही प्रकारच्या बुरशीला चुन्यामुळे प्रतिबंध होतो. ही बाब लक्षात घेऊन झाडाच्या खोडाला खालच्या बाजूला गेरुचा पट्टा, तर त्या वरच्या भागाला चुन्याचे लेपन केले जाते. यामुळे बहुतांश प्रकारच्या बुरशींना प्रतिबंध होतो.

सामान्यपणे बुरशी ही झाडाच्या खालच्या बाजूने लागण्यास सुरुवात होते व ती झाडाच्या वरील भागाकडे पसरत जाते. त्यामुळे या बुरशीला प्रतिबंध करणारा गेरु व चुना हा झाडाच्या खालच्या बाजूला म्हणजेच खोडाला लावला जातो. याप्रकारे गेरु व चुना झाडाच्या खोडाला सुव्यवस्थितप्रकारे लावल्यास बुरशीला प्रभावी अटकाव होतो.

गेरु व चुना झाडाच्या खोडाला लावल्यामुळे वाळवी संसर्गास अटकाव करण्यासही मदत होते.

झाडाच्या खोडाला खोडकिडा (Stem Borer) चा प्रादुर्भाव झाल्यास त्या किड्यांद्वारे खोड पोखरले जाऊन झाड पडण्याचा व झाडाचा मृत्यू होण्याचा संभव असतो. यादृष्टीने देखील झाडाच्या खोडाला गेरु व चुन्याचे लेपन दिलेले असल्यास खोडकिड्यापासून झाडाच्या खोडाचे संरक्षण होण्यास मदत होते.

उन्हाळ्यामध्ये प्रखर उन्हामुळे झाडाच्या खोडाच्या सालीस भेगा पडण्याचा शक्यता असते. मात्र, झाडाच्या खोडला गेरु व चुन्याचा लेप दिलेला असल्यास खोडाच्या सालीचे उन्हापासून संरक्षण होऊन भेगा पडण्याची शक्यता कमी होते.

हिवाळ्यामध्ये दिवसाचे तापमान व रात्रीचे तापमान यात असणा-या तफावतीचा प्रतिकूल परिणाम झाडाच्या खोडावर होतो. हा प्रतिकूल परिणाम कमी करण्याच्या कामी गेरु व चुन्याचे लेपन असल्यास मदत होते. (malaysia sultan visit mumbai, observe bmc garden)

गेरु व चुन्याचे लेपन केल्यामुळे होणारे इतर फायदे

रस्त्याच्या कडेला असणा-या झाडांच्या खोडांना गेरु व चुन्याचा लेप दिल्यामुळे झाडांची व रस्त्याच्या कडांची दृश्यमानता वाढून संभाव्य अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.झाडांच्या खोडांना सुयोग्यप्रकारे गेरु व चुन्याचा रंग दिल्यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडते.

गेरु व चुन्याचा रंग दिलेली झाडे ही सार्वजनिक संस्थेच्या मालकीची असल्याचे प्रतिकात्मक पद्धतीने अधोरेखित होते

संबंधित पोस्ट