रेल्वेच्या लेखा विभाग ऐक्याचा सर्वोच्च न्यायालयात विजय

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा आत्मा म्हणून ओळख असणाऱ्या लेखा विभागाच्या गेल्या पंचवीस वर्षे प्रलंबित असलेल्या सुधारीत वेतनश्रेणीच्या दाव्याचा निकाल दि.०८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला.

भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि मिळणाऱ्या पैशान्पैशाचा हिशोब ठेवून विकास कामावर खर्च करण्याच्या प्रस्तावावर अचूक मार्गदर्शन करण्याचे काम लेखा विभाग करत असतो.ख-या अर्थाने रेल्वेच्या प्रगतीमध्ये  लेखा विभागाची महत्त्वाची भूमिका असते. रेल्वेतील इतकी महत्वाची भूमिका बजावणारे कर्मचारी मात्र सुधारीत वेतन श्रेणी पासून सतत वंचित ठेवले गेले होते.वेतन आयोगाकडून सतत डावलले गेल्याने आणि कुणीही दखल घेत नसल्याने अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर लेखा कर्मचाऱ्यांनी आपली एक स्वतंत्र संघटना काढून संघर्ष जारी ठेवला. रेल्वेच्या प्रत्येक मंडल आणि क्षेत्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसह दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन वेळा धरणे प्रदर्शनचा कार्यक्रम केला.एकदा संसदेवर प्रचंड असा धडक मोर्चा नेण्यात आला.एवढे करूनही संपूर्ण भारतीय रेल्वेवर जबाबदारीने कार्य करणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे अल्पसंख्येच्या भावनेतून दुर्लक्षितच केले गेले.

शेवटचे हत्यार म्हणून संघटनेच्या वतीने संसदेसमोर उपोषण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय संघटन सचिव विठ्ठलराव वठारे यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले होते.त्या उपोषणाची दखल रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागली.  पाचव्या वेतन आयोगाने एक जानेवारी ९६ पासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवी वेतनश्रेणी लागू केली मात्र लेखा विभागाची सुधारीत वेतनश्रेणी २००३ पासून लागू केली गेली.या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात सतत पाठपुरावा केल्यामुळे हायकोर्टाने दि.१८ डिसेंबर २०१९ रोजी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांत वेतन अदा करण्याचे आणि त्याचे पालन न झाल्यास ६ टक्के व्याजासहित भुगतान करण्याचे आदेश दिले असता प्रशासनाने कोविड-१९ चे कारण सांगत अवधि मागून घेतला आणि उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.त्या दाव्याचा निकाल दि.०८ जानेवारी २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला.उशिरा का होईना न्याय मिळाल्याचे आणि हा विजय  भारतीय रेल्वेतील सर्व लेखा कर्मचाऱ्यांच्या एकीच्या बळाचा आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष पार्थो भट्टाचार्य आणि राष्ट्रीय सचिव रेजी जॉर्ज यांनी सांगितले.

या निकालामुळे भारतीय रेल्वेवर सर्व लेखा कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट