नवघर रोड, मुलुंड पूर्वचे व.पो.नि. पुष्पराज सूर्यवंशी यांचा निरोप समारंभ संपन्न
- by Reporter
- Jan 09, 2021
- 1096 views
मुलुंड:(शेखर भोसले)नवघर रोड, मुलुंड पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्पराज सूर्यवंशी यांची सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती झाल्याने त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ तसेच लवकरच त्यांची इतर ठिकाणी बदली होणार असल्याने त्यांचा निरोप समारंभ शुक्रवार दि ८ जानेवारी रोजी गौतम जैन मित्र मंडळ व मुलुंड पूर्व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आय.ई.एस. स्कूल येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता. विभाग क्र ७ चे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मुलुंड पूर्वेतील व्यापारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
गौतम जैन यांनी यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्पराज सूर्यवंशी यांच्या गौरवार्थ भाषण करताना सांगितले की, 'सूर्यवंशी साहेबांनी आपल्या कारकीर्दीत आपल्या स्टाफ कडुन अतिशय शिस्तबध्द कारभार करून घेतला. मुलुंड पूर्वेला कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. प्रत्येक विभागात त्यानी जातीने लक्ष दिले. अशा पोलीस अधिकाऱ्याला आमचे त्रिवार अभिवादन. त्यांच्याच कारकिर्दीत करोनासारखे जागतिक संकट आले. त्यालाही त्यांनी धैर्याने तोंड दिले. ते रात्री अपरात्री जातीने विभागात फेर फटका मारीत होते. त्यातच ते करोना बाधित झाले. त्यातून बरें होऊन त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. अशा कर्तव्यदक्ष, कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्याचा निरोप समारंभ करण्याचे भाग्य आम्हा मुलुंडकरांना लाभले असून ते लवकरच येथून बदली होवून जाणार असल्याने अतीव दुःख आम्हां सर्वांना होत आहे.' यावेळी पुष्पगुच्छ देवून व शाल अर्पण करून पुष्पराज सूर्यवंशी यांचा हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी
व.पो.नि.पुष्पराज सूर्यवंशी यांनी भाषण करून सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.
रिपोर्टर