
पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
- by Adarsh Maharashtra
- Jan 02, 2021
- 1561 views
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी विविध मान्यवरांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ
मुंबई, : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहीजे. माझी वसुंधरा अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माझी वसुंधरा ई-शपथ (ई-प्लेज) उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी या उपक्रमात सहभागी होत राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटीबद्ध राहीन, अशी ई-शपथ घेतली.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह राज्याच्या विविध भागातून मंत्री, राज्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, नव्या वर्षाची सुरुवात कशी करावी याची एक नवीन वाट पर्यावरणाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन या कार्यक्रमातून दिली गेली आहे. या अभियानातून फक्त देशालाच नव्हे तर जगालाही पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल. कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या. लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदुषणामध्ये मोठी घट झाली होती. आपण विकास करताना झाडांची कत्तल करतो आणि तोच विकास झाल्यानंतर रस्त्यांवर ऑक्सीजन मिळविण्यासाठी यंत्राचा वापर करतो. विकासातील हा असमतोल दूर करुन पर्यावरणपुरक अशा शाश्वत विकासाची कास आपल्याला धरावी लागेल. यासाठी राज्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाला संपूर्ण पाठबळ देऊ, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
‘दोन इमारतींच्या मधून उगवणारा सूर्य’
पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी काही उदाहरणे दिली. ते म्हणाले की, पुर्वी आम्ही चित्रकला स्पर्धा घेत असू, तेंव्हा उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असताना अनेक मुले दोन डोंगरांमधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींच्या मधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी जपणूक करण्याची आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे, असे श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंचतत्वांना केंद्रस्थानी ठेवून पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने मोठा पुढाकार घेतला आहे. माझी वसुंधरा अभियानातून याला निश्चितच चालना मिळेल. राज्यात यापुर्वी यशस्वी झालेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान याप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानालाही लोकचळवळीचे स्वरुप द्यावे, त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही श्री.पवार त्यांनी यावेळी दिली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वातावरणातील विविध बदलांना सामोरे जात त्यावर मात करुन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानातून मोठी चालना मिळेल. वातावरणातील बदल हे मानवतेसमोरील मोठे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण विभागाने सुरु केलेल्या ई-शपथ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. सर्वांनी या नव्या वर्षात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने किमान एक तरी संकल्प करुन त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री.थोरात यांनी केले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वातावरणातील बदलांमुळे विविध वादळे, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी विविध संकटे येत आहेत. याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. राज्यात मागील वर्षभरात अशा विविध आपत्तीग्रस्तांना सुमारे साडेतेरा हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण अशी संकटे रोखण्यासाठी आता आपल्याला व्यापक प्रयत्न करावे लागतील. यासाठीच विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधत पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा ध्यास राज्याने घेतला आहे. आरेची जमीन संरक्षीत करणे, 10 संरक्षीत वनांची घोषणा, हजारो एकर क्षेत्राचे कांदळवन जाहीर करणे असे विविध निर्णय घेतले जात आहेत. समृद्धी महामार्गाचा पर्यावरणपूरक विकास करण्याला चालना देण्यात येत आहे. आता या चळवळीत सर्वांनी सहभागी होत ई-शपथेच्या माध्यमातून योगदान द्यावे आणि पर्यावरण रक्षणाचा किमान एक संकल्प करुन तो कायम आचरणात आणावा, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले.
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आजच्या कार्यक्रमात सर्वांनी संकल्प केल्यानुसार माझी वसुंधरा अभियानाला सर्वांच्या सहभागातून लोकचळवळीचे स्वरुप देऊ. पर्यावरण रक्षणाच्या कामात राज्याला आघाडीवर ठेवू. पर्यावरण रक्षण ही सर्वांची हरीत जीवनशैली होईल यासाठी प्रयत्न करताना येत्या 5 जूनपर्यंत अभियानाची गतिमान अंमलबजावणी करु, अशी ग्वाही श्रीमती म्हैसकर यांनी दिली.
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर कुमार श्रीवास्तव यांनी या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सर्वांनी ई-शपथ घेऊन पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूल मंत्री श्री. थोरात, पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांच्यासह ऑनलाईन उपस्थित सर्व मंत्री, अधिकारी आदींनी यावेळी ऑनलाईन लॉगीन करुन पर्यावरण संवर्धनासाठी कटीबद्ध असल्याची ई-शपथ (ई-प्लेज) घेतली. या सर्वांना लगेच ऑनलाईन ई-प्रमाणपत्रे प्राप्त झाली. राज्यातील सर्व लोकांनी www.majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन #EPledge या मेनुवर क्लिक करुन ई-शपथ (ई-प्लेज) घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम