मुलुंडकर चरणसिंग सप्रा यांची मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड
- by Reporter
- Dec 21, 2020
- 562 views
मुलुंड : (शेखर भोसले)अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशाने मुलुंडचे रहिवासी, माजी आमदार, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांची मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुलुंडकर चरणसिंग सप्रा यांच्या नियुक्तीमुळे मुलुंड विभागीय कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मुलुंडमध्ये सर्वत्र त्यांच्या अभिनंदनाचे फलक झलकताना दिसत आहे. तसेच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात गर्दी केल्याचे आढळून आले आहे.
माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची मुंबई विभागीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, युवा नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, एआईसीसी संघटनेचे प्रमुख वेणुगोपाल आणि एच. के. पाटील यांचा तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व इतर पदाधिकाऱ्यांचा मी आभारी असून नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांच्या साथीने मुंबई कॉंग्रेस बळकट करून पक्ष वाढविण्यासाठी अपार मेहनत घेणार" असे चरणसिंग सप्रा यांनी कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.
मा. आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल ईशान्य मुंबई युवक काँगेसचे सरचिटणीस संतोष गांवकर, ईशान्य मुंबई व्यापारी सेलचे अध्यक्ष सुनिल जैन तसेच काँग्रेस नेते अनिल सावंत यांनी तसेच इतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची मुलुंड येथील कार्यालयात भेट घेवून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
रिपोर्टर