इमारती कोसळतात,आगी लावल्या जातात,भ्रष्ट अधिकारी मात्र मालामाल होतात

बी' विभागात रझाक इमारत ही सात मजली इमारत कोसळली,पुढे काय?

मुंबई(प्रतिनिधी)  इमारती कोसळतात,आगी लागतात जीव जातात तेवढया पुरते शासन-प्रशासन गळे काढतात.सरकारी तिजोरीतून अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीची घोषणा होते,जसे काही आपल्याच खिशातून मदत जाहीर केली अशा थाटात राजकारणी मिडियासमोर सुतकी चेहरे दाखवत प्रसिद्धी करून घेतात,हे चित्र आता सर्वसामान्यांना चीड आणणारे झाले आहे, अशी खंत डिग्नीटी फौंडेशन एक्सलेन्सी पुरस्काराने सन्मानित समाजसेवक दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.

शहरात होणारी इमारत पडझडी,जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आता पुन्हा नव्याने कागदी घोडे नाचविले जात आहेत.काही वर्षांपूर्वी वांदरे येथील नाल्यावर बांधलेल्या गोविंद टॉवर पडझडीनंतर हा सिलसिला अव्याहतपणे सुरू आहे. इमारत कोसळणे आगी लागणे ह्या नित्याच्या बाबी झाल्याचे मत शिरवडकर यांनी व्यक्त केले. आज सक्षम कायदे आहेत. ते राबविण्याकरता गलेलठ्ठ वेतनावर कार्यरत प्रशासकीय यंत्रणा आहे. परंतु सारी यंत्रणाच भ्रष्टाचाराने पोखरली आहे.त्या त्या वेळचे मुख्यमंत्री चौकशीचे केवळ आदेश देतात,पण फिरून दिलेल्या आदेशाचे काय झाले हे पहातात काय?जनताही हे सारे विसरून जाते अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी फोर्ट येथील भानुशाली इमारत,नागपाडयातील मिश्रा इमारत कोसळली.त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी निश्चित धोरण बनविण्यासाठी बैठक घेतली. मग याआधी पडझडीनंतर निश्चित धोरण ठरले नव्हते काय?असा प्रश्न पडतो.आज पालिका क्षेत्रात अंदाजे १६ हजाराहून अधिक धोकादायक इमारती आहेत. दस्तुरखुद्द पालिका मालकीच्या इमारती धोकादायक आहेत. त्यांची नव्याने पुर्नबांधण      करण्याएैवजी त्यांच्या तकलादू जुजबी दुरुस्तीवर ठेकेदांराच्या भल्यासाठी व त्यातून मिळणाऱ्या मलईसाठी करोडोने निधी खर्च होताना दिसतो.आता या सर्व गोष्टीची यादी तयार करण्याचे,रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. मध्यंतरी पालिकेतून कित्येक इमारतीच्या नस्ती गहाळ झाल्याचे प्रकरण बरेच गाजले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

दरम्यान 'बी' विभागात रझाक इमारत ही सात मजली इमारत कोसळली,पुढे काय?तर १७/१९ आणि २१/२३ काझी सय्यद स्ट्रीट या बी विभागातील ५ मजली बेकायदा इमारतीस आग लागली.पालिका बी विभागात कित्येक जुन्या इमारतींवर नव्याने इमले चढले आहेत,काही इमारतीचे प्लीथ खणून इमारती धोकादायक केल्या गेल्या आहेत.तर काही ठिकाणी दोन गाळयामधील संरक्षक भिंती-पिलर काढून इमारती धोकादायक केल्या आहेत.याकडे पालिका अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष केले जाते ते कोणाच्या दबावाने?यावर मात्र कोणीच भाष्य करीत नाही,पालिकेचा दक्षता विभाग असून नसल्यासारखा वाटतो. अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीनंतर झोपी गेलेली पालिका यंत्रणा जागी झाली आणि मुंबईतील ७६ मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी झाली. अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या २९ मॉलना नोटीस बजावण्यात आली आहे. म्हणजे मागील अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या मॉलमधील त्रुटीकडे जबाबदार अधिकारी का दुर्लक्ष करीत होते?सारा लक्ष्मीबंधनाचा कारभार!

विशेष म्हणजे आज मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. आणि अशा बेकायदा इमारतीत मुद्रांक शुल्क वसूल करणे,भाडेकरु सहभागीदारी गृहनिर्माण सोसायटयांची नोंदणी करणे,सर्व तऱ्हेच्या नागरी सुविधा, परवाने सहजपणे उपलब्ध करून देणे असे प्रकार महसूल विभाग, सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून कोणाच्या कृपेने होतात हाच कळीचा मुद्दा आहे.या साऱ्यांची सक्षम तपास यंत्रणांकडून चौकशी झाल्यास बरेच भूकंप होतील. याकरता केवळ बदल्या न करता भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांची एसीबी/एसआयटी सारख्या तपास यंत्रणाकडून चौकशी करून अशा भ्रष्टाचाऱ्यांची नावे सर्व कार्यालयात-प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध करणे ही काळाची गरज आहे. असे परखड विचार दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट