
लग्न समारंभासाठीच्या अटी शहरासाठी लागू नाहीत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्टीकरण.
- by Reporter
- Sep 18, 2020
- 995 views
पुणे (प्रतिनिधी) : लग्न समारंभाकरिता शासनाकडून जारी करण्यात आलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. लग्न समारंभाची पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र केटरिंग
असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन पुणे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी केटर्स आणि मंगल कार्यालय व लॉन्सचालकांनी पाळावयाच्या अटींविषयी आक्षेप घेणारे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले. त्या वेळी झालेल्या चर्चेत विक्रम कुमार यांनी लग्न समारंभासाठी जारी करण्यात आलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नसल्याचे स्पष्ट केले. किशोर सरपोतदार, संजीव वेलणकर, प्रकाश डिंगणकर आणि विनय ताटके या वेळी उपस्थित होते.
विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहरात लग्न समारंभासाठी पन्नास जणांची मर्यादा आहे. परंतु, त्यामध्ये फक्त वधू आणि वर पक्षाच्या लोकांचाच समावेश असेल. त्यामध्ये भटजी, वाढपी यांचा समावेश नाही. तसेच लग्नासाठी पोलीस परवानगीची गरज नाही. लग्न समारंभाची सी.डी. पोलीस चौकीला जमा
करायची नाही. त्याचप्रमाणे लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या पन्नास जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करायची नाहीत. त्यासंदर्भात मंगल कार्यालय, लॉन्स मालक-चालक आणि केटर्स या कोणाकडूनही लेखी हमीपत्र घ्यायचे नाही. लग्न समारंभाची पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही. शासनाने जारी केलेल्या आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करण्याची हमी केटरिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
रिपोर्टर