केन४२ ची कोचिंग संस्थांमध्ये ११ कोटीची प्रारंभिक गुंतवणूक

मुंबई (प्रतिनिधी) : केन ४२ या भारतातील सुपर अ‍ॅप एडटेक प्लॅटफॉर्मने उच्च शिक्षण कोचिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले असून पुढील वर्षात या बाजारातील ५ टक्के हिस्सा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या ‘एडटेक स्टार्ट-अप’ कंपनीने आपल्या ११ कोटींच्या सुरुवातीच्या गुंतवणूकीच्या ३० टक्के रकमेची तरतूद या नव्या उपक्रमासाठी राखून ठेवली आहे. ‘टर्बोस्टार्ट’ या कंपनीचा आधार

असलेली ‘केन ४२ ’ ही एक विद्यार्थी-केंद्रित संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या एकात्मिक शैक्षणिक प्रवासात त्यांना सर्वंकष शैक्षणिक परिसंस्था उपलब्ध करून देण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. सर्व शैक्षणिक प्लॅटफॉर्म्सवर ‘डिजिटलायझेशन’ची आवश्यकता अचानकपणे निर्माण झालेली असल्याचे पाहता, कोचिंग संस्था, विशेषत: स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करवून घेणारी केंद्रे आता ‘टेक-सॅव्ही’ बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘केन ४२ ’ आता या कोचिंग संस्थांना वैयक्तिक सोल्यूशनसह नवीन साधने व तंत्रज्ञान राबविण्यात मदत करेल.

‘केन ४२ ’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश राजू म्हणाले, ‘’कोचिंग इन्स्टिट्यूट ही मोठी बाजारपेठ आहे आणि ‘कोविड-१९’च्या साथीच्या परिणामामुळे सुमारे ८५ टक्के लोक ऑनलाइन संस्थांकडे जाण्यास तयार झाले आहेत. आम्हाला वाटते की कोचिंग मार्केटमध्ये प्रवेश करणे ही योग्य दिशेने वाटचाल आहे. ही केवळ काळाची गरज नाही, तर ऑनलाईन कोचिंग इन्स्टिय्टूट्समुळे लहान व मध्य शहरांतील विद्यार्थ्यांना प्रीमियम संस्थांमध्ये प्रवेश मिळणे सुलभ होते. केन ४२ मध्ये आमचा ठाम विश्वास आहे की शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे आणि डिजिटायझेशन झाले नाही, तर विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक वर्ष गमावतील. म्हणूनच, आम्ही भारतातील मुख्य प्रशिक्षण संस्थांसाठी काम करीत आहोत आणि त्यांचा प्रवास डिजिटलकरणाकडे सुरू करून देणार आहोत.”

‘केन ४२ ’ने ‘के-१२’ आणि उच्च शिक्षण विभागात बरीच मजल मारली आहे. यामध्ये या कंपनीने वेगवान डिजिटलायझेशन आणले आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा व शिक्षकांचे मार्गदर्शन या आवश्यकता एकाच प्लॅटफॉर्ममधून ती पुरवते. कोचिंग संस्थांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरविण्यापेक्षा ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठीचे परिवर्तनाचे काम अखंडपणे करण्याचे ‘केन ४२ ’चे उद्दिष्ट आहे. या ऑनलाइन वर्गांमध्येदेखील उच्च गुणवत्तेचे वैयक्तिकृत शिक्षण मिळेल, याची खातरजमा करण्यात येत आहे. ऑनलाईन कोचिंग हा आता अनेकजणांचा आधार ठरला आहे. अशावेळी कोणत्याही भागातील विद्यार्थी आता दर्जेदार आणि समान शिक्षण घेऊ शकतील.

मार्चच्या मध्यापासून देशातील शाळा आणि विद्यापीठे बंद आहेत आणि तेव्हापासूनच ‘नीट’ आणि ‘जेईई’सारख्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुनःपुन्हा बदलण्यात येत आहे. परीक्षांचा हंगाम सुरू होत असताना, कोचिंग संस्था पूर्णपणे ऑनलाईन होण्यासाठी आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी सज्ज होत आहेत.

संबंधित पोस्ट