
डॉक्टरने भीती दाखवल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे' आधी चिठ्ठी लिहून वृद्धाची आत्महत्या
- by Reporter
- Sep 11, 2020
- 424 views
भोसरी (प्रतिनिधी) : थंडीतापाच्या आजारासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धाला डॉक्टरने भीती दाखवली. त्यामुळे ‘डॉक्टरने भीती दाखवल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ अशी चिठ्ठी लिहून वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.११) पहाटे भोसरी येथे उघडकीस आली.
शिवाजी मारुती होळकर (वय ६८, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाणे वस्ती, भोसरी येथे शुक्रवारी सकाळी होळकर यांनी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
पोलिसांना तपासात होळकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की, ‘गेल्या आठ दिवसांपासून मला थंडी-ताप येत होता. त्यामुळे जवळच्या एका खासगी दवाखान्यात गेलो होतो. तिथल्या डॉक्टरांनी मला भीती दाखवली. त्या भीतीपोटी मी आत्महत्या करीत आहे.’अशी चिठ्ठी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस येताच नातेवाईकांनी होळकर यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
रिपोर्टर