थँक अ टिचर' महानगरपालिकेचा ऑनलाईन शिक्षण दिन कार्यक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर “शिक्षक दिन” साजरा  करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक  हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. दरवर्षी शिक्षक दिना दिवशी ज्या  शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे, अशा शिक्षकांचा गौरव करण्यात येतो.

कोव्हिड-१९ ह्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, ह्यावर्षी  शिक्षक दिन नेहमीप्रमाणे साजरा  करता येणे शक्य नसल्यामुळे शिक्षकांबद्दल शनिवारी ५ सप्टेंबर, २०२० ला विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी व ज्या व्यक्तीला आपण गुरु मानतो त्यांच्याप्रती आपले ऋण व्यक्त  करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ए व बी विभागात "थँक अ टिचर" अभियानांतर्गत विभागाच्या प्रशासकीय अधिकारी वीणा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली झूमच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या ऑनलाइन सोहळ्यास बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) मा. राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी (शहर) अशोक मिश्रा, संगीत विभागाच्या प्राचार्या सुवर्णगौरी घैसास व कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पासपोली मराठी शाळा क्र.१ मधील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षिका वृषाली खाडये मॅडम यांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून मुलांनी ऑनलाइन व्हिडिओ द्वारे स्वतः गायन केलेल्या इशस्तवन व स्वागतगीताने झाली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने ए व बी विभागातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या पैकी चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी गटानुसार विविध विषय देऊन चित्रे मागविण्यात आली व त्यापैकी निवडक चित्रे व विजेते यांचा ऑनलाइन प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला, तसेच सर्व चित्रांचा छान असा व्हिडिओ तयार करून सर्वाना दाखविण्यात आला.

संगीत स्पर्धेद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना आपले गीत प्रत्यक्ष ऑनलाइन कार्यक्रमात सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली या मध्ये विद्यार्थी तर सहभागी होतेच परंतु शिक्षकांनी देखील हिरीरीने सहभाग घेत बहारदार व सुरेल गीते सादर करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.

त्यानंतर कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थी व शिक्षकांसाठी मास्क तयार करणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यामध्ये देखील शिक्षकासोबतच विद्यार्थ्यांनी देखील आकर्षक मास्क तयार करून दाखविले. परीक्षकांच्या निवडीनुसार ह्या सर्व निवडक विद्यार्थी व शिक्षकांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

कोव्हिड-१९ काळात "शाळा बंद मात्र शिक्षण सुरु" या विषयावर व आजच्या ऑनलाईन अध्यापनावर ए व बी विभागाच्या काही शिक्षकांनी शाळा बंद असल्या तरीही विविध माध्यमातून, उपक्रमातून शिक्षण कसे सुरु आहे यावर प्रकाश टाकला व माझे प्रेरक शिक्षक या विषयावर आपल्या शालेय जीवनातील आठवणी जिवंत केल्या. या सोबतच ऑनलाइन विषय देऊन वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इ. चे देखील आयोजन करण्यात आले होते.

कोव्हिड-१९ च्या प्रदुर्भावाच्या  काळात शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शिक्षणाव्यतिरिक्त  कोव्हिड योद्धा म्हणून कामे पार  पाडली. उदा. वॉर रूम सहायता कक्ष, नागरिक सर्वेक्षण, विलगीकरण  कक्षामध्ये निरीक्षक म्हणून इ. या साठी या सर्व शिक्षकांचे कौतुक करून त्यांना "कोव्हिड योद्धा" म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. ए व बी विभागाच्या प्रशासकीय अधिकारी वीणा सोनावणे यांनी सोहळ्यास संबोधन केले व आभार मानले.
   
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालिका हेमांगी लेले, झूम मीटिंग च्या सर्व तांत्रिक बाबी ज्ञानेश्वर आंग्रे, संगीत शिक्षिका अश्विनी फडके, कला शिक्षिका मीरा बोडके, कार्यानुभव शिक्षिका धनश्री निर्गुण व तंत्रस्नेही शिक्षक श्रीनिवास गाजूला, शंकर भालेराव, दिनेश गायकवाड व अली यांचे विशेष सहाय्य लाभले. ए व बी विभागातील सर्व मुख्याध्यापक इन्चार्ज शिक्षक व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संबंधित पोस्ट