मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार माने यांचा "एससी'चा दाखला बोगस असल्याची तक्रार
- by Adarsh Maharashtra
- Aug 28, 2020
- 1068 views
सोलापूर :अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत यांनी सादर केलेला हिंदू कैकाडी हा अनुसूचित जातीचा दाखला बोगस आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तहसील कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून त्यांनी हा दाखला मिळविल्याचा आरोप सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. आमदार यशवंत माने यांनी यापूर्वी विमुक्त जातीच्या आरक्षणाचे लाभ घेतले आहेत. एकाच व्यक्तीने दोन जातीचे लाभ घेतल्याचा आरोप व त्याबाबतचे पुरावेही क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार ऍड. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे असलेला बेडा जंगम जातीचा दाखला सोलापूरच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. खासदार महास्वामी यांचे प्रकरण ताजे असतानाच आता अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात आता जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या जातीच्या दाखल्याचा विषय पेटला आहे.
राज्यात राष्ट्रवादी सत्तेत आहे. ज्या आमदारांच्या विरोधात तक्रार केली आहे ते आमदार राष्ट्रवादीचे आहेत तर ज्यांनी आमदारांच्या विरोधात तक्रार केली आहे ते शिवसेना उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे मोहोळच्या राजकारणाचा तडका राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात असलेली सर्व कागदपत्रे व पुराव्याच्या आधारे त्यांनी बुलडाणा येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. आमदार माने यांनी जातीचा बनावट दाखला सादर करून फसवणूक केल्याची तक्रारही क्षीरसागर यांनी मोहोळ पोलिसांकडे दिली आहे.
या तक्रारीची एक प्रत त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यां मधीलच हिंदू कैकाडी ही जात अनुसूचित .जातीमध्ये समाविष्ट आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील कैकाडी समाज हा विमुक्त जाती संवर्गात आहे. आमदार यशवंत माने गेल्या चार पिढ्यांपासून इंदापूर तालुक्यातील शेळगावमध्ये वास्तव्यास आहेत. शेळगाव मधील जमिनीचे गेल्या शंभर वर्षांपासूनचे त्यांच्या शेतमालकीचा सातबारा उतारा व फेरफार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हणमंत माने या दोघांनी शिक्षणासाठी विमुक्त जातीसाठी असलेले लाभ घेतल्याचे पुरावे आहेत. या दाखल्याची नोंद आजही इंदापूर तहसील कार्यालयात असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. आमदार यशवंत माने यांनी 2008 मध्ये बुलढाण्याच्या प्रांताधिकाऱ्यां कडून हिंदू कैकाडी अनुसूचित जातीचा दाखला मिळविल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. शेळगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयात लिपिक पदावर नोकरीस असल्याचे भासवून या दाखल्याची पडताळणी करण्यास पाठविली. या दाखल्याची जात वैधताही झाली आहे. ही शाळा सध्या अस्तित्वातच नसल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
मतदार संघ राखीव झाला आणि वादग्रस्त आमदारांनी चर्चेत आला
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे एकहाती वर्चस्व असलेला सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ म्हणून मोहोळची ओळख आहे. 1995, 1999 व 2004 या मतदार संघातून राजन पाटील सलग तीन टर्म आमदार होते. 2009 च्या मतदार संघ पुनर्रचनेत मोहोळ विधानसभा मतदार संघ अनुसूचित राखीव झाला. मतदार संघ राखीव झाला तरीही येथून 2009 मध्ये प्रा. लक्ष्मण ढोबळे, 2014 मध्ये रमेश कदम आणि 2019 मध्ये यशवंत माने या नवख्या व्यक्तींना राष्ट्रवादीकडून आमदार करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. तब्बल तीस वर्षे हा मतदार संघ माजी आमदार राजन पाटील यांनी त्यांच्या हातात ठेवला आहे.
मतदार संघ राखीव झाल्यानंतर या मतदार संघातून विधानसभेत गेलेले प्रा. ढोबळे, रमेश कदम आणि आता यशवंत माने या तीन वादग्रस्त आमदारामुळे मोहोळ मतदार संघ चर्चेत आला आहे.2014च्या ऐन विधानसभा निवडणुकीत या मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीने या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला. त्यांच्या ऐवजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांना संधी दिली. रमेश कदम आमदार झाल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत ते तुरुंगात गेले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेला अपहार, मोहोळ तहसीलवर झालेले जाळीतोड आंदोलन यामुळे ते वादग्रस्त राहिले आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी त्यांचा पत्ता कट केला. त्यानंतर राष्ट्रवादीने या मतदार संघातून इंदापूरचे यशवंत माने यांना संधी दिली. त्यांच्याही आमदारकीचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याच्या आत त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित झाला आहे. सर्वांत विशेष म्हणजे मोहोळमधून ज्यांना ज्यांना आमदारकी मिळाली त्यांनी उमेदवारीचा पत्ता कट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरीचे निशाण फडकविल्याचाही इतिहास आहे.
आमदाराच्या मुलाच्या दाखल्याला हरकत
मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तहसीलमधून हिंदू कैकाडी या अनुसूचित जातीचा दाखला काढला आहे. त्याच आधारावर आमदार माने यांनी त्यांचा मुलगा तेजस याच्या जातीच्या दाखल्यासाठी प्रयत्न केला.तेथील तहसीलदारांनी वंशावळ जुळत नसल्याचा शेरा मारला असल्याची माहिती तक्रारकर्ते सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबतचा पुरावा आपल्या कडे सध्या उपलब्ध नसल्याचेही क्षीरसागर यांनी स्पष्टपणे सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम