न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाव्हायरसचा शिरकाव; निवडणुका लांबणीवर, लॉकडाऊन वाढवला

ऑकलंड  : कोरोनामुक्त झाल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसने शिरकाव केला आहे. मागील २४ तासात न्यूझीलंडमध्ये १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील अक्टिव्ह रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. ही बाब चिंताजनक यासाठी आहे की, जून महिन्यात न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. तसंच १०० दिवसात एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने देशात शिरकाव केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक महासंचालक अशले ब्लूमफील्ड यांच्या माहितीनुसार, "सर्व नवे कोरोनाबाधित हे ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित आहेत.यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातील अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये होता. सुरुवातीला तो कोरोना निगेटिव्ह होता. पण १४ दिवसांच्या क्वॉरन्टाईन पीरियडच्या बाराव्या दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईन आहे. तर इतर १२ कोरोनाबाधित कम्यूनिटीमधील होते."

न्यूझीलंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १२७१

नव्या कोरोनाबाधितांसह न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या आता १२७१ झाली आहे. त्यामध्ये ६९ अक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

२६ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) ऑकलंड क्षेत्रात अलर्ट ३ लॉकडाऊन आणि इतर ठिकाणी अलर्ट २ लॉकडाऊन घोषित करुन २६ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन १२ दिवसांचा असेल. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडमध्ये एक महिन्यात राष्ट्रीय अलर्ट ४ स्तरावरचा लॉकडाऊन केला होता. यानंतर जून महिन्यात कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकणारा तो पहिला देश बनला होता. परंतु १०२ दिवसांच्या अंतरानंतर मागील आठवड्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण  आढळण्यास सुरुवात झाली.

संबंधित पोस्ट