
कल्याण-डोंबिवलीतील ९७ पैकी ६२ पोलिस कोरोना मुक्त एका पोलिसाचा मृत्यू तर केडीएमटीतील चार जणांचा मृत्यू
- by Reporter
- Jul 17, 2020
- 724 views
डोंबिवली (श्रीराम खंडू) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यापासून कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ९७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ६२ पोलिस कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीला एकूण ३३ पोलिसांवर वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केलेला लॉकडाऊन यशस्वीरित्या लागू करण्यात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पोलिसांची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तपास नाक्यांवर असो की रूग्णालयात किंवा कवारंटाईन सेंटर आणि कन्टेटमेंट झोन अशा प्रत्येक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून पोलिस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून जबाबदारी निभावणाऱ्या हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. पोलिसांना जबाबदारी पार पाडताना फिजिकल डिस्टनसिंग ठेवता येत नाही. वेळोवेळी लोकांची मदत करावी लागते. त्यासाठी नागरिकांच्या संपर्कातच रहावे लागते. तसेच कंन्टेटमेंट झोनमध्ये किंवा रूग्णालयांमध्ये ड्युटीअसल्यास कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. वेळप्रसंगी पोलिसांच्या जिवावरही बेतले जाते. डोंबिवली विभागाचा आढावा घेतला असता रामनगर, मानपाडा, विष्णुनगर आणि टिळकनगर अशी ४ पोलिस ठाणी येतात. या विभागात आतापर्यंत ४१ पोलिसांना कोव्हीड - १९ ची बाधा झाली, तर २० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्या १९ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील कोरोना मुक्त झालेल्या २० जणांमधील बहुतांश पोलिस कामावर देखील रूजू झाल्याचे डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी सांगितले. तर कल्याण विभागामधील महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी आणि खडकपाडा या ४ पोलिस ठाण्यांतील आतापर्यंत एकूण ५६ पोलिसांना कोव्हीड - १९ ची बाधा झाली आहे. यातील ४२ पोलिस कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १४ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
केडीएमटीतील आतापर्यंत चार कर्मचाऱ्यांचा बळी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील संजय नजीर तडवी या ४१ वर्षीय वाहकाचा कोव्हीड - १९ च्या बाधेमुळे बुधवारी १५ जुलै रोजी मृत्यू झाला. जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच त्याची प्रयाण ज्योत मावळली. संजय तडवी यांच्या पाश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवर आहे. तर त्याच दिवशी वर्णे ता. कर्जत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या वर्णे गावात राहणारे रमेश नारायण नरे या ५२ वर्षीय चालकाचा सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नरे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई असा परिवार आहे. परिवहन उपक्रमातील चालक राजेंद्र तळेले यांचा २४ जून, तर त्यानंतर वाहक हुसेन बादशाह कोलार यांचा २८ जून रोजी मृत्यू झाला. लागोपाठ या ४ कोरोना योद्ध्यांच्या मृत्यूनंतर केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांत, विशेषतः चालक-वाहकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
रिपोर्टर