मनसेच्या राड्यानंतर बिथरलेल्या गंगाथरण डी.यांनी नालासोपारा पश्चिमेला असलेल्या मनसेच्या शाखेवर तोडक कारवाई
- by Adarsh Maharashtra
- Jul 17, 2020
- 1736 views
नालासोपारा: मनसेचे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई विरार पालिकेच्या मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर गंगाथरण डी. यांना शिवीगाळ करत राडा केल्यानंतर काल गंगाथरण डी.यांनी नालासोपारा पश्चिमेकडील मनसेच्या अनधिकृत शाखेवर तोडक कारवाई केली आहे.पालिकेने थेट मनसेची शाखा तोडल्याने पालिका आयुक्त व मनसे मध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पडली आहे.त्यामुळे यापुढे मनसे विरुद्ध गंगाथरण डी. असा संघर्ष उभा राहणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.या तोडक कारवाई नंतर अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओद्वारे आयुक्तांच्या मनमानी व पक्षपाती कारभाराचा निषेध नोंदवत वसई विरार मधील सर्व राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनाही जाधव यांनी लक्ष करत ठाकुरांनी आता आयुक्तांचा बंगला तोडण्यासाठी पाठवावे असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान पालिकेचे प्रभाग समिती ई चे सहा. आयुक्त पंकज भुसे यांनी या शाखेवर कारवाई करताना अनधिकृत बांधकाम असल्याचे कारण पुढे केले आहे.परंतु भुसे यांनी पालिका क्षेत्रात सुरु असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून केवळ आयुक्तांच्या आदेशाने सूडबुद्धीने कारवाई केल्याचे मनसे महापालिका कामगार सेनेचे सरचिटणीस चंद्रशेखर गुंजारी यांनी सांगितले विशेष म्हणजे कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली.त्यामुळे या कारवाईवर अनेक सवाल उपस्थित होत आहे. तसेच ही कारवाई करताना पालिकेने कार्यालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा देशाचा तिरंगा व राजमुद्रा असलेल्या पक्षाचा झेंड्याची विटंबना केल्याने आयुक्त व सहा. आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.दुसरीकडे या कारवाईमुळे मनसैनिकही संतप्त झाले आहेत. त्यांनी पालिकेच्या नालासोपारा विभागीय कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.या सर्व घडामोडीमुळे ऐन कोरोना महामारीत वसई विरार मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पालिकेच्या प्रभाग समिती 'जी'हद्दीतील वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये पालिकेने १००० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये अवघ्या ०५ दिवसात सौम्य लक्षणे असलेले व लक्षणे दिसत नसलेले ६१० पॉझीटीव्ह रूग्ण दाखल करण्यात आलेले होते. परंतु या कोविड सेंटरमधील रूग्णांच्या गैरसोयीचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.या कोविड सेंटरमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांचा जीवघेणा छळ केला जात असल्याची बाब मनसे च्या निदर्शनास आली होती.त्या अनुषंगाने मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपले पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांसह या कोविड सेंटर ची पाहणी करून मंगळवारी दुपारी आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. मात्र फक्त दोनच कार्यकर्त्याला आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जाधव आक्रमक झाले होते. त्यातच आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी लॉकडाऊन संदर्भात एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्या वेळीसुद्धा मनसेला दूर ठेवले गेले होते. शिवसेना नेते आयुक्तांना भेटतात, तेव्हा त्यांच्याबरोबर ८-१० जण तरी असतात. मग आम्ही चार जण चर्चा करणार असू, तर त्यात गैर काय आहे, असा सवाल करत जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोविड सेंटरमधील हेळसांड कारभाराचे फोटो आयुक्तांच्या दरवाजावर चिकटवले. त्यानंतर आयुक्तांना उद्देशून शिवीगाळ करून निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली होती. दरम्यान मनसेच्या राड्यानंतर बिथरलेल्या गंगाथरण डी.यांनी नालासोपारा पश्चिमेला असलेल्या मनसेच्या शाखेवर कारवाई केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम