नुकसान २.५ लाखाचे, सरकारकडून चेक ५ हजाराचा, शेतकरी म्हणाला,'राहु द्या तुम्हालाच'
- by Reporter
- Jul 15, 2020
- 620 views
नाशिक (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांचो प्रचंड नुकसान झाले. ऐन पावसाळ्याच्या हंगामात शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे अंदरसुल इथं संतप्त शेतकऱ्यांनी सरकारने दिलेल्या मदतीचा निषेध केला आहे. अंदरसुलच्या एका शेतकऱ्यानं सरकारला ५ हजाराच्या मदतीचा चेक परत केला आहे.
गेल्या महिन्यात निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाने मदत देण्यास सुरुवात केली असून येवल्याच्या अंदरसुल येथील शेतकरी गजानन देशमुख यांना देखील मदत मिळाली. मात्र, चेक पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते सुमारे अडीच लाख रुपयाचे तर मदत फक्त ५ हजार रुपयांची मिळाली.
'शासनाने मदत देऊन एका प्रकारे माझी चेष्टा केली, या पेक्षा जास्त खर्च तर मंत्री, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यावर झाला असेल', असा आरोप करत संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने तहसीलदाराकडे चेक परत देऊन शासनाचा निषेध केला.
३ जूनला निसर्ग चक्रीवादळाने राज्याच्या इतर भागासह येवल्यात देखील धुमाकूळ घातला होता. वादळात अंदरसुल येथील गजानन देशमुख या शेतकऱ्यांचे पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार भारती पवार यांनी या नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
देशमुख यांचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सुमारे अडीच लाख रुपयांचा करण्यात आला होता. मात्र, त्यांना शासनाकडून मदत म्हणून फक्त ५ हजार रुपयांचा चेक देण्यात आल्यामुळे देशमुख संतप्त झाले आहे. येवला भागातील नुकसानग्रस्त शेतजाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर मग कोकणातील नुकसानग्रस्तांचा काय होईल, असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे.
रिपोर्टर