
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा मुख्यमंत्र्यांनी पनवेल महापालिकेकडून मागितला अहवाल
पनवेल संघर्ष समितीच्या मागणीची उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल
- by Reporter
- Jul 13, 2020
- 2256 views
पनवेल (प्रतिनिधी) : चार वर्षांपूवी निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाला अवघे चार महिने वैद्यकीय अधिकारी लाभले. त्यांच्या बदलीनंतर ते आणि इतर महत्वाची पदे कोविड काळातही रिक्त आहेत. ती तात्काळ भरण्यात यावीत, या पनवेल संघर्ष समितीच्या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः साक्षरी करून महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयातून समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना पाठवण्यात आली आहे.
महापालिकेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर नाईक आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी थेट संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे अहवाल मागविला आहे. संघर्ष समितीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच दखल घेतल्याने वैद्यकिय अधिकारी आणि इतर आरोग्य विषयी बाबींचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत.
या पत्रात दोन मुख्य वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी नियुक्ती तसेच आरोग्य खात्यातील आकृतीबंध विषयी कांतीलाल कडू यांनी अभ्यासपूर्णरित्या सविस्तरपणे विवेचनाद्वारे तक्रार केली आहे. त्या सर्व प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुक्त सुधाकरराव देशमुख यांच्याकडे मागितला आहे
रिपोर्टर