बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचे 'अर्धशतक'रुग्ण वाढीचा वेग १.७२ टक्क्यांवरुन आता १.३९ टक्क्यांवर
- by Adarsh Maharashtra
- Jul 11, 2020
- 1628 views
मुंबई दि .११ जुलै चेस द व्हायरस', ट्रेसिंग – ट्रॅकींग- टेस्टींग - ट्रेटिंग या चतु:सूत्रीनुसार अविरतपणे करण्यात येत असलेली कार्यवाही मिशन झिरो, अव्याहतपणे सुरु असलेल्या गृहभेटी, बहुस्तरीय पद्धतीने सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी, मुंबई पोलीसांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना; यासारख्या विविध बाबींचे नियोजन व व्यवस्थापन महापालिकेद्वारे सुव्यवस्थितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाधित किंवा संशयित रुग्णांवर अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने महापालिकेने आपल्या ४ प्रमुख सर्वेापचार रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये समर्पित सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक रुग्णालयांमध्ये व खासगी रुग्णालयांमध्ये देखील वैद्यकीय सुविधांचे नियोजनपूर्वक सुव्यवस्थापन करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त विविध संस्थांच्या सहकार्याने तात्पुरत्या स्वरुपात १० ठिकाणी उभारलेल्या कोविड समर्पित उपचार केंद्रांच्या माध्यमातून (जम्बो फॅसिलिटी) देखील वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. या नुसार विविध स्तरीय उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बृ
महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने चाळीशी पार केली होती. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने आज ५० दिवसांचा टप्पा गाठत 'अर्धशतक' केले आहे. तर रुग्ण वाढीचा वेग देखील १.७२ टक्क्यांवरुन १.३९ टक्क्यांवर आला आहे.
'कोरोना कोविड – १९' या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्यास लागणारे 'दिवस' म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. सांख्यिकीय गणनेनुसार महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सध्या ५० दिवसांचा कालावधी लागतोय.. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच ७ दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.
महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये सकारात्मक वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. २२ मार्च रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ ३ दिवस होता. जो १५ एप्रिल रोजी ५ दिवस, दि. १२ मे रोजी १० दिवस, २ जून रोजी २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस; २४ जून रोजी ४१ दिवस नोंदविण्यात आला होता. . १० जुलै २०२० रोजी दिवस अखेरीस हा कालावधी तब्बल ५० दिवसांवर पोहचला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे विभागस्तरीय विश्लेषण केले असता, हा कालावधी वांद्रे पूर्व - खार पूर्व - सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या 'एच पूर्व' विभागात १३४ दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल मशीद बंदर - सँडहर्स्ट रोड या रेल्वे स्थानकांनजिकच्या परिसराचा समावेश असलेल्या 'बी' विभागात ९८ दिवस; कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या 'एल' विभागात ८८ दिवस; दादर – वडाळा - माटुंगा - शीव इत्यादी परिसराचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७९ दिवस एवढा झाला आहे. उर्वरित २० विभागांपैकी १० विभागांमध्ये हा कालावधी ५० दिवसांपेक्षा अधिक आहे. २४ जून रोजी महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा किमान कालावधी हा २० दिवस होता; हा कालावधी आता किमान २७ दिवसांवर आला आहे.
रुग्णसंख्येतील दैनंदिन सरासरी टक्केवारीच्या वाढीत सातत्याने घट
रुग्ण दुपटीच्या कालावधी सोबतच आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होण्याची सरासरी टक्केवारी. रुग्ण वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी जेवढी कमी तेवढी परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शक असते. रुग्ण संख्येत होणारी दैनंदिन वाढ ही जेवढी कमी, तेवढी ती बाब सकारात्मक असल्याचे मानले जाते. रुग्ण संख्येत होणारी वाढ ही आधल्या दिवशी असणारी रुग्णांची संख्या आणि त्याच्या दुस-या दिवशीची रुग्णसंख्या यातील फरकाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण असते. हे विश्लेषण व दर हा प्रती १०० रुग्णांमागील आकडेवारीवर आधारित असतो. महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्येत होणा-या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत आहे. २४ जून रोजी दिवस अखेरीस हा दर सरासरी १.७२ टक्के एवढा होता. ज्यात आता 'सकारात्मक घट' नोंदविण्यात आली असून हा दर आज सरासरी १.३९ टक्के एवढा झाला आहे. विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा 'एच पूर्व' विभागात ०.५ टक्के, 'बी' विभागामध्ये ०.७ टक्के, 'एल' विभागात ०.८ टक्के आणि 'एफ उत्तर' विभागात ०.९ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. उर्वरित २० विभागांपैकी ११ विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा १.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
११ मार्च रोजी कोविडचा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आला होता. 'संसर्गजन्यता' तुलनेने अधिक असणा-या या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणा-या महापालिका क्षेत्रापुढे मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी
महापालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक सुविधांसाठी आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
'चेस द वायरस आणि 'ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग' ची चतु:सूत्री
सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने 'चेस द वायरस' आणि 'ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग' ची चतु:सूत्री या उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोना विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश आहे. वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल आणि त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धती नुसार अधिकाधिक प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे. अभियान पद्धतीने करण्यात येत असलेल्या या कार्यवाहीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा प्रभावीपणे शोध घेऊन त्यांचे विलगीकरण व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्याची कार्यवाही सातत्याने केली जात आहे.
महापालिका क्षेत्रात 'कोरोना कोविड १९' ची रुग्ण संख्या शुन्यावर आणणे आणि यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची कणखरपणे व अभियान स्वरुपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. 'कोरोना कोविड १९' विषाणू विरुद्धच्या युद्धामध्ये महापालिकेच्या उपाययोजनांना यश येत असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी आता ५० दिवसांवर गेला आहे. मात्र, असे असले तरी ज्या भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असेल, त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने ५० फिरते दवाखाने विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेत आहेत. गरज असणा-या भागांमध्ये २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कंटेनमेंट झोनची सुनियोजित अंमलबजावणी*
महापालिका क्षेत्रातील जे परिसर 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आले, त्याठिकाणी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये परिसरातील नागरिकांच्या स्तरावर नियमितपणे जाणीवजागृती करणे, नागरिकांना यांच्या परिसरात बाहेर पडण्याची गरज भासू नये यासाठी यथायोग्य सर्व दक्षता घेण्यासही जीवनावश्यक बाबींची उपलब्धता त्याच परिसरात करून देण्याबाबतची कार्यवाही करणे इत्यादी बाबींची परिणामकारक अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे.
सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण
झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर यासारख्या बाबी यथायोग्य प्रमाणात उपलब्ध असतील याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत आहे.
वैद्यकीय चाचणी, वैद्यकीय उपचार व खाटांचे विभागस्तरीय व्यवस्थापन
महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांसह त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी वेळच्यावेळी होऊन त्यापैकी 'पॉझिटिव्ह' चाचणी अहवाल हे महापालिकेकडे २४ तासात उपलब्ध व्हावेत, तर यापैकी ज्यांना गरज असेल त्यांना मदत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात किंवा जम्बो फॅसिलिटी असलेल्या उपचार केंद्रात वेळच्यावेळी 'बेड' उपलब्ध व्हावेत, याविषयीचे सुव्यवस्थापन साध्य व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व म्हणजे २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागस्तरीय 'वॉर रुम' कार्यान्वित करण्यात आल्या. या विकेंद्रीत व्यवस्थापनामुळे गरजूंना त्यांच्या परिसरा निकटच्या रुग्णालयात 'बेड' मिळण्याची शक्यता दुणावण्यासह तुलनेने अधिक लवकर उपचार सुरु होण्यास गती मिळाली.यानुसार करण्यात आलेल्या सुव्यवस्थापना मुळे आज महापालिका क्षेत्रातील अनेक उपचार केंद्रातील खाटा या सकारात्म करित्या रिकाम्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम