
कर्तव्य वर्दीच, नाळ माणुसकीशी....!!
- by Adarsh Maharashtra
- Jul 08, 2020
- 1174 views
दि.4/07/2020 रात्रपाळी कर्तव्य 08: 00 वाजता सुरू होणार होतं सायन वरून आझाद मैदान पोलीस स्टेशन ला येण्यापासून कसरत सुरू झाली. मुंबई मध्ये अतिवृष्टी असा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा करत आकाश फाटावे आणि आकाशातील पाणी एकच ठिकाणी सांडावे तसा धो धो पाऊस चालू होता. करोना मुळे आधीच पोलिस स्टेशन ला कर्तव्यावर कमी मनुष्यबळ आणि त्यांच्यावर असलेली अधिक जबाबदारी याचा विचार करता कर्तव्यावर पोहचणे अनिवार्य होते. असा विचार करत अनेक पर्याय तपासत एका कलीग अधिकाऱ्याच्या मदतीने 20-25 की.मी चे ने जवळ वाटणारे अंतर भर पावसात बाईक वरून जाऊन एकदाच पोलिस स्टेशन ला पोहचले. आणि तस वरिष्ठांना कळविले देखील. अस वाटले आता पोलिस स्टेशनला पोहचलो म्हणजे आपण लढाई जिंकलो पण अस नव्हते खरी लढाई तर अजून सुरू व्हायची होती.
पोलीस स्टेशनला यायला रात्री चे 10 वाजले. आज ड्युटी आझाद मैदान मोबाईल क्रमांक 1 वाहनावर माझी ड्युटी होती . बाहेर पाऊस धो धो कोसळत होता . त्यातच रस्त्यावर भर पावसात सतर्क नाकाबंदी चालू होती. पाऊस एवढा होता की त्यामध्ये छत्री देखील आपली साथ देऊ शकत नव्हती. नाकाबंदी 3.00 ला संपली. मी स्टाफला पोलिस स्टेशनला जाते अस सांगुन त्यांना देखील थोडा आराम करा असे सांगितले . मी पोलिस स्टेशनला पोहचून रेन कोट काढतच होते तोच माझ्या मोबाईलची रिंगटोन वाजली . दचकतच फोन घेतला. समोरून आवाज आला मॅडम मेट्रो सिनेमाच्या समोर एक महिला जोरजोरात ओरडत आहे. तुम्ही घटनास्थळी ताबडतोब या. घड्याळात पाहिले तर पहाटेचे 04.00 वाजले होते. नक्की काय झाले असेल असा विचार करत पुन्हा रेनकोट अंगावर चढवला आणि भर पावसात पायी पायी पोलिस स्टेशनहून मेट्रो सिनेमापर्यंत गेले. अंदाजे 70 ते 75 वर्षाची एक महिला सांगत अाली की एक बाई फुटपाथवर झोपलेली आहे आणि जोरजोरात ओरडत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोणी तिच्या जवळ जात नव्हते. पाऊस धो धो कोसळतच होता. पूर्ण रेनकोट घालून मास्क लावून मेट्रो सिनेमाला जाऊन पाहिलं तर अंदाजे 30 ते 35 वयाची महिला फूटपाथवर आडवी पडून जोरजोरात ओरडत होती. सर्व स्टाफसह जवळ जाऊन पाहिलं तर धो धो पावसात फूटपाथवर त्या महिलेच्या अंगावर कपडे नाही आणि तिची डिलिव्हरी होत होती. हा सारा प्रकार पाहून मन सुन्न झालं. माझी सहकारी स्टाफ महिला पोलीस स्टाफ यांनी तात्काळ एवढ्या भर कोसळणाऱ्या पावसात राहत्या घरी पळत जाऊन कडपे घेऊन आली. आणि त्या महिलेला चादर देऊन अंगावर कपडे घातली. आम्ही तो पर्यंत पोलीस कंट्रोल ला कॉल करून ambulance ची मागणी केली. हॉस्पिटला संपर्क केला पण आम्हाला मदत प्राप्त झाली नाही. त्या महिलेशी बोलण्याचा प्रयन्त केला पण तिच्या बोलण्यातून ती आम्हाला मतिमंद वाटली. स्वतः स्टाफ घेऊन जवळच असणाऱ्या कामा रुग्णालय येथो गेलो. तेथील RMO शी बोललो त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी येण्यासाठी स्पष्ट नकार दिला पुन्हा चालत पावसात मेट्रो सिनेमा जवळ आलो तर महिला शिपाई यांनी सांगितले की बाळ जन्माला आले परंतु बाळाची पूर्ण नाळ बाहेर आली नाही. आता काय करायचे समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. अद्याप ambulance आली न्हवती. ती महिला जोरजोरात ओरडत होती. तिचे ते आरडणे भयाण पावसाला देखील हादरुन सोडून काळजाचा थरकाप उडवत होते. पाऊस आपले काम चोख पार पाडत होता. जणू तो आज आमची अग्नी परीक्षाच घेत होता. अशावेळी एखादी वयस्कर पोलिस सहकारी सोबत असती तर तिची अधीकची मदत झाली असती परंतु आता ती परिस्थिती आम्हालाच हाताळणे गरजेचे होते. अजून आम्हाला वैद्यकीय मदत मिळाली नव्हती. त्या महिलेला वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे होते. माझा स्टाफ, मी असे सगळे देवाचे नाव घेत कशी मदत मिळेल याचा विचार करत होतो आणि त्या प्रमाणे प्रयत्न चालू होते. त्यामध्ये पावसाने जणू त्याचे रौद्र रूप धारण केले होते. फोन करायला मोबाईल हातात घेतला तर भर पावसात तो ही हाताळता येत नव्हता जणू नियती आमची कठोर परिक्षाच घेत होती . त्यात अजून भर की काय , त्या आजूबाजूला असणाऱ्या तीन ते चार घुशींनी त्या महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. आम्ही त्यांना हुसकून दिले की त्या पुन्हा यायच्या जणूकाही त्या देखील आमचा अंत पाहत होत्या. कामा हॉस्पिटल ते मेट्रो सिनेमा असे दोन - तीन वेळा जाऊन आले पण डॉक्टर काही घटनास्थळी यायला तयार होईना. शेवटी बातमी सांगायला आलेल्या आजीला मदत करा अशी विनंती केली त्या हसत हसत तयार झाल्या. त्याक्षणी त्या डॉक्टरपेक्षा त्या आजीच देवदूत वाटल्या. दरम्यान कंट्रोल,ambulance यांना वारंवार फोन करत होतो. त्यांना सद्य परिस्थिती ची कल्पना देत होतो. नियंत्रण कक्षाशी देखील संपर्क करत होते. पहाटेचे 5 वाजले होते अजून पाऊस तर त्याचं कर्तव्य चोख बजावत होता तो अजुन जास्तच आक्रमक झाला होता . पुन्हा कामा हॉस्पिटल ला गेलो पुन्हा डॉक्टरला विनंती केली पण ते एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते तुम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन या .आता मात्र आम्ही अक्षरश: हतबल झालो होतो . धीर मात्र सोडला नव्हता. शेवटी डॉक्टरांना हाथ जोडून विनंती केली की फक्त बाळाची नाळ कापून द्या आम्ही त्या महिलेला हॉस्पिटल मध्ये घेऊन येतो. तरीही डॉक्टर त्यांच्या मतावर ठाम होते मी हॉस्पिटल सोडून येऊ शकत नाही. नाळ कापणं सोपं काम नाही क्रिटिकल आहे. तेव्हा डॉक्टरांना हात जोडून म्हंटलं म्हणून तर आम्ही तुमची मदत मागत आहोत. परंतु त्या डॉक्टरांना जराही पाझर फुटला नाही. अस वाटत होत आपण एका दगडावर डोक आपटत आहोत. शेवटी पुन्हा भर पावसात मेट्रो सिनेमाला आलो. पहाटेचे 6 वाजले. थोडसं कुठं उजाडलं होतं . पावसाचे बरसणे काही केल्या थांबत नव्हते. त्यात अजून एक बिकट समस्या निर्माण झाली ती म्हणजे कावळ्यांची. कावळे जमू लागले. बाळाच्या नाळेभोवती ते घिरट्या घालू लागले. न आम्ही फोन करुन कुठे मदत मिळते का ते पाहतच होतो .आणि त्यात भर की काय अजुन त्या मातेच्या आणि बाळाला जोडलेल्या नाळेला मुंग्या लागायला लागल्या. अडचणी वाढत होत्या. आम्ही पोलीस कंट्रोल, सरकारी रुग्णालया privet रुग्णालय सगळयांना संपर्क केला पण मदत मात्र कुठून ही प्राप्त होत न्हवती. ambulanc भेटली तर ड्रायव्हर जागेवर नाही आणि ड्रायव्हर भेटला तर त्या ambulance ला डॉक्टर नाही. शेवटी एक ambulance आली ती पण डॉक्टरशिवाय. त्याचा चालक आम्हाला सांगायला लागला की तुम्ही याला कॉल करा, त्याला कॉल करा. हे काय माझं काम नाही. तरी मी आलो. तुम्हीच सांगा यात माझा काही संबंध आहे का? असे बोलू लागला. त्याला डॉक्टर कुठे उपलब्ध होईल असे विचारलं तर तो मला माहित नाही अस बोलून आणि माझी ड्युटी संपली असं सांगून निघून गेला. त्यावेळी मनात आले की एक कर्तव्यदक्ष पोलिस अस कधीच म्हणत नाही माझे कर्तव्याची वेळ संपली मी जातो.
आता सकाळचे 7 वाजता प्रभादेवी विभाग येथून 108 ची ambulance अाली आणि त्यात डॉक्टर पण होत्या त्यांनी pp किट ची मागणी केली त्यांना pp किट दिलं त्यांनी त्या बाळाला अलगद उचलून pp किट वर ठेऊन नाळ कापली. बाळाने हातपाय हलवताच आणि आम्हाला जग जिंकल्याचा आनंद झाला. त्या मातेला आणि बाळाला रुग्णालयात दाखल केल. बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी संगीतले पण सदरची मतिमंद आहे हे सांगितले ......
सध्या दोघेही सुखरूप आहेत. उपचार चालू आहेत. हे ऐकल्यानंतर शेवटी एकदाचा मोकळा श्वास सोडला. बाळ आणि त्याची आई सुखरूप असल्याने आमचे प्रयत्न सफल झाल्याचे समाधान झाले. ३-४ तासापासून भर पावसात केलेले प्रयत्न सफल झाल्याचे समाधान माझ्या आणि माझ्या स्टाफच्या चेहऱ्यावर झळकत होते.
कधी कधी वाटते पोलिस सोडून कोणताही सरकारी कर्मचारी हे काम माझे नाही म्हणून हात वर करतो आणि आपली जबाबदारी झटकतो. पण पोलिसाला अस कधीच करता येत नाही आणि तो करत ही नाही.
........एक कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम