पुणे हादरलं! महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार व आमदार क्वारंटाईन

पुणे (प्रतिनिधी) : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं होते.

तत्पूर्वी, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली होती. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र तेच धक्कादायक प्रकार असून पुण्यातील राजकारणात सुरु आहेत असंच म्हणावं लागेल. पुण्याच्या महापौरापाठोपाठ आता उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांच्यासह ६ नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

महापालिकेतल्या या बातमीनं पुण्यातील राजकीय वातावरण हादरलं आहे. पुण्यातील दोन खासदार आणि ४ आमदार यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे तर आतापर्यंत महापालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पुणे महापालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. परंतु ही तपासणी निगेटिव्ह आली होती. यापूर्वी त्यांना किरकोळ सर्दी, खोकला होणे असा त्रास झालेला होता. परंतु, दरवेळी टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान, ताप आल्याने त्यांनी पुन्हा कोरोना टेस्ट करून घेतली. ही टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली. ते खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असून लवकरच बरा होऊन पुणेकरांच्या सेवेत हजर होईन असे महापौरांनी ट्विट केले आहे. मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली, यात त्यांच्या कुटुंबातील ८ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

संबंधित पोस्ट