जेष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचे मुलुंड येथील राहत्या घरी निधन.
- by Adarsh Maharashtra
- Jul 04, 2020
- 1339 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) ज्या काळात कॅलिग्राफी हा शब्दही ऐकिवात नव्हता तेंव्हापासून कॅलिग्राफी करणारे, अनेक मराठी नाटकं, विविध जाहिराती आपल्या वळणदार लेखणीतून साकारणारे जेष्ठ सुलेखनकार कमल शेडगे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. मुलुंड पूर्व येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुलुंड पूर्व येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा अक्षर असून तो देखील सुलेखन क्षेत्रात कार्यरत आहे.
कमल शेडगे यांचा जन्म २२ जून १९३५ रोजी मुंबईतील गिरगावात झाला. त्यांचे वडील देखील इंग्रजी दैनिकाची शिर्षके बनवण्याचं काम करायचे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत कमल शेडगे यांनी सुलेखन क्षेत्रात प्रवेश केला. कमल शेडगे यांचा सुलेखन प्रवास हा सहा दशकांहून अधिक काळचा आहे. १९६० च्या दशकात त्यांनी महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात काही काळ काम केले. त्यानंतर नाट्यनिर्माते मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' या नाट्य संस्थेच्या नाटकांसाठी सुलेखन करायला सुरूवात केली. जवळपास ५० वर्ष त्यांनी मराठी नाटकांसाठी सुलेखन केले तसेच विविध जाहीरातींची शिर्षके त्यांनी त्यांच्या वळणदार लेखणीतून साकारली.
रायगडाला जेंव्हा जाग येते, गारंबीचा बापू, स्वामी, लग्नाची बेडी, नागमंडल, शुभमंगल सावधान, क्रॉस कनेक्शन, 'प्रेमा तुझा रंग कसा', 'ती फुलराणी', 'ऑल द बेस्ट', 'वस्त्रहरण', नटसम्राट, गोष्ट जन्मांतरीची, सूर्याची पिल्ले, काचेचा चंद्र, जंगली कबूतर, गगनभेदी, अशा विविध नाटकांच्या जाहिरातीसाठी त्यांनी सुलेखन केलं होतं. शिवाय त्यांनी लिहीलेली माझी 'अक्षरगाथा', 'चित्राक्षर' आणि 'कमलाक्षरं' ही सुलेखन वरील पुस्तके प्रसिध्द आहेत. २०११ साली त्यांनी आपले परममित्र मोहन वाघ यांच्या आठवणी जागवण्यासाठी चंद्रलेखाच्या ८० नाटकांसाठी केलेल्या सुलेखनाचं आगळं वेगळं प्रदर्शन भरवलं होतं. यात अनेक दिग्गजांनी या कलाकाराच्या कलेला दाद दिली.
मराठी नाटकांसाठी सुलेखन करत असतानाच त्यांनी मराठी पुस्तकांसाठी मासिकांसाठी आणि दिवाळी अंकांसाठी सुलेखन करायला सुरूवात केली. मराठीतील माहेर, दिपावली या दिवाळी अंकांचं सुलेखन कमल यांचं आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या 'कालनिर्णय' या दिनदर्शिकेचं सुलेखन देखील कमल शेडगे यांनीच केलेलं आहे.
मराठी नाटकांनंतर त्यांनी आपल्या सुलेखनकलेचा वापर मराठी सिनेमे आणि हिंदी सिनेमांची टायटल तयार करण्यासाठी सुरू केला. बयो, एक फुल्ल तीन हाफ, एक रात्र मंतरलेली अशा काही सिनेमांची टायटल्स त्यांनी तयार केली. तर हिंदीत देखील भूल भुलैय्या, प्यारे मोहन, सरकार राज, उमराव जान आणि द्रोणा अशा अनेक सिनेमांच्या टालटलचे सुलेखन कमल शेडगे यांच्या कुंचल्यातून तयार झालं आहे.
कमल शेडगे यांनी सुलेखन क्षेत्राला व्यावसायिक रूप मिळवून देण्यात मोठ योगदान दिलेलं आहे. त्यांच्यामुळेच ही कला फक्त कला न राहता ती अनेकांच्या जीवनाचं साधन झाली. आपल्या रेषांमधून त्यांनी या नावांना असं काही जीवंत केलं की प्रेक्षकांच्या हृदयात ही नावं कायमची कोरली गेली. आपल्या आयुष्यात एवढं काम करूनही आपल्याला संगणक वापरता येत नाही ही खंत त्यांना कायम लागून राहिली. जर आपल्याला संगणक येत असते तर हेच काम अधिक परिणामकारकरित्या आणि अधिक सफाईने करता आलं असतं असं ते कायम सांगत असत.
कमल शेडगे यांच्या जाण्याने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या जाण्याने सुलेखन क्षेत्रातील एक तपस्वी ऋषी आपल्यातून निघून गेल्याची भावना कलाक्षेत्र आणि नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध कलावंतांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम