डीप ब्रेन स्टिम्युलेशन प्रक्रियेमुळे ६८ वर्षीय महिला पदार्थ न सांडता आणि हाताला कंप न येता जेवण करू लागली
इसेन्शिअल ट्रेमर (ईटी) या सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या मेंदूच्या आजाराच्या गंभीर स्वरुपाचा त्रास रुग्णाला होता
- by Reporter
- Jun 29, 2020
- 388 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील मूव्हमेंट डिसऑर्डर न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अगरवाल, फंक्शनल न्यूरोसर्जन डॉ. नरेन नायक यांच्या नेतृत्वाखालील टीमने गंभीर स्वरुपाचा इसेन्शिअल ट्रेमर (ईटी) हा आजार झालेल्या ६८ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार केले. या आजारात हात, डोके आणि आवाजात कंप निर्माण होतो. त्यांच्यावर डीबीएस (डीप ब्रेन स्टिम्युलेशन) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यात कंपावर नियंत्रण मिळविणाऱ्या मेंदूतील पेशींना स्टिम्युलेशन देण्यात येते.
श्रीमती शुभदा तेले या पुण्यात राहत असून त्या गृहिणी आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्या हाताला तीव्र स्वरुपाचा कंप होता. जेव्हा त्या एखादी वस्तू उचलण्यासाठी जात असत तेव्हा त्यांचा हात मोठ्या प्रमाणावर हलत असे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना स्वत:च्या हाताने जेवण करणे, पाणी पिणे, वस्तू उचलणे शक्य होत नव्हते. परिणामी, जेवण करण्यासाठीही त्या आपल्या कुटुंबियांवर अवलंबून होत्या. त्यांनी अनेक मेंदूविकारतज्ज्ञांची भेट घेतली, अनेक प्रकारची औषधे घेतली. पण त्या उपचारांनी हात थरथरणे थोडेसे कमी झाले किंवा तात्पुरता दिलासा मिळाला.
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील मूव्हमेंट डिसऑर्डर क्लिनिकचे प्रमुख व डीबीएस प्रोग्रॅमचे इनचार्ज डॉ. पंकज अगरवाल म्हणाले, “या रुग्णाला गंभीर स्वरुपाचा इसेन्शिअल ट्रेमर (ईटी) हा आजार होता. ईटी हा एक मेंदूविकार असून या आजारात दोन्ही हात, डोके आणि आवाजात अनियंत्रित कंप निर्माण होतो. याची सुरुवात बहुधा वयाच्या ६० वर्षांनंतर होते, पण तो तरुण वयातही होऊ शकतो. याचे कारण अज्ञात आहे. पण त्यामुळे नियंत्रित हाचलाल करणाऱ्या मेंदूतील नेटवर्कमध्ये असाधारण लयबद्ध दोलन क्रिया होते.”
“ईटी हा आजार पार्किनसन्स डिसीज (पीडी) या आजाराशी मिळताजुळता वाटत असला तरी ईटीमध्ये एखादी क्रिया करताना कंप निर्माण होतो. पीडीमध्ये हात एखाद्या ठिकाणी ठेवतना थरथरतो. त्यामुळे ईटीचा कप उचलणे किंवा पाणी ओतणे किंवा लिखाण यासारख्या दैनंदिन क्रियांवर परिणाम होतो. औषधे एका मर्यादेपर्यंत मदत करू शकतात. पण श्रीमती तेले यांच्यासारख्या रुग्णांवर त्यांची मात्र लागू पडत नाही. त्यांचा कंप हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आणि त्यांना असहाय्य करणारा असल्यामुळे त्यांना थॅलेमिक डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) देण्यात आले.”, असे डॉ. अगरवाल यांनी सांगितले.
मेंदूच्या काही भागांमध्ये म्हणजेच थॅलेमसच्या (प्रस्तिष्काच्या तळाशी असलेला चेतापेशींचा समूह) व्हीआयएम न्यूक्लेअसला डीबीएस दिल्यास ते ईटीवर अत्यंत परिणामकारक असते आणि ईटीवर उपचार करण्यासाठी डीबीएस ही सर्वाधिक प्रमाणात वापरण्यात येते. यात अत्यंत बारीक धातूच्या तारा मेंदूमध्ये घातल्या जातात. यात तारांमधून विद्युत स्पंदने पाठविण्यात येतात आणि काही हालचाली नियंत्रित करता येतात. ताठरपणा, मंदत्व आणि कंप यासारख्या आजारांवर या उपचारांचा चांगला परिणाम होतो. त्यांच्यावर ४ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना त्या शुद्धीतच होत्या. चमचा वापरणे, पेनाने लिहिणे यासारख्या क्रियांची कृती डॉक्टर त्यांना करण्यास सांगत होते. तार काळजीपूर्वक मेंदूतील त्या विशिष्ट भागात घातली तेव्हा हाताच्या कंपावर तत्काळ दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
“रुग्णाला कंपापासून तत्काळ आणि पूर्ण दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताने घास खाल्ला, पाणी न सांडता आणि हलवता प्यायले. हे तब्बल तीन वर्षांनी घडत होते. डीबीएसमुळे कंप निघून जाऊन शकतो आणि यांच्यासारख्या काही रुग्णांना पूर्ण दिलासा मिळू शकतो.”, असे डॉ. अगरवाल म्हणाले.
श्रीमती सुलभा तेले म्हणाल्या, “गेली ४ वर्षे मी पूर्णपणे माझ्या कुटुंबियांवर अवलंबून होते आणि याचा मला खूप त्रास होत होता. पण ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या डीबीएस उपचारांनी मला एक वरदानच मिळाले. या उपचारांनंतर मी जेवू शकते, पिऊ शकते आणि माझी दैनंदिन कामे करण्यासाठी माझे हात वापरू शकते आणि तब्बल ४ वर्षांनी माझ्या २५ वर्षांच्या मुलासाठी जेवण तयार करू शकते. आता मी माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगू शकते. किंबहुना, हे माझ्यासाठी एक नवीन आयुष्यच आहे.”
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर म्हणाले, “आम्ही सर्वंकष मूल्यमापन करतो आणि मेंदूविकाराच्या रुग्णांवर त्यांच्या वैयक्तिक गरजांप्रमाणे उपचार करतो. त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित फॉलो-अप घेतला जातो. आतापर्यंत ग्लोबल हॉस्पिटलमधील पार्किनसन्स डिसीज आणि मूव्हमेंट डिसऑर्डर्स क्लिनिकमध्ये गेल्या ८ वर्षांमध्ये ८०००हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांच्या गुंतागुंतीच्या उपचारांवर मात करण्यासाठी उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर आणि अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.”
रिपोर्टर