
नगरकरांना धोक्याची घंटा ! पुणे, औरंगाबादमध्ये कोरोनाची गाडी सुसाट
- by Adarsh Maharashtra
- May 18, 2020
- 1109 views
नगर :जिल्ह्याच्या शेजारील पुणे व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांत कोरोनाने थैमान घातले आहे. नगर जिल्हा दोन्हीच्या छायेत आहे. तिच मोठी भिती आहे. चोरट्या मार्गाने येथील काही लोक या जिल्ह्यात आल्यास मोठा अनर्थ होऊ शकेल. त्यामुळे आता सिमेवरील खेड्यांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे.
कोरोना आता नगर जिल्ह्यात पाय पसरू लागला आहे. इतर शहरांच्या मानाने धीम्या गतीने का होईना, त्याने साठी पार केलीय. शेजारील पुणे जिल्ह्याने तीन हजार, तर औरंगाबादने 800चा आकडा केव्हाच पार केलाय. या दोन्ही जिल्ह्यांच्या छायेत असलेल्या नगर जिल्ह्याला सांभाळावे लागेल. दोन्हीकडूनही छुप्या मार्गाने लोकांचे आक्रमण होऊ शकते.त्यामुळे नातंगोतं सध्या बाजूला ठेवा. कोरोनाग्रस्त माया घरात घेऊन स्वतःबरोबर इतरांना उपद्रव देऊ नका.शेजारील दोन्ही जिल्ह्यांतील जनता हतबल झाली आहे प्रशासनही गेल्या दोन महिन्यां पासून जिवाची बाजी लावत आहे. अनेक अधिकारी एकही सुटी न घेता काम करीत आहेत. त्यामुळे शेजारील जिल्ह्यांतील लोकांशी संपर्क येणार नाही, असे नियोजन करून प्रशासनाला सहकार्य करा. नगरवर शेजारील दोन्ही जिल्ह्यांची छायाच पडू देऊ नका.
पुण्याशी नाते घट्ट; पण...
नगर जिल्ह्याचे पुण्याशी घट्ट नाते आहे. शहरातील अनेक जण पुणे जिल्ह्यात नोकरी वा व्यवसाया निमित्त रोज जात होते. नगरकरांनी नाते वाढविताना कायम औरंगाबाद किंवा मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्राला प्राधान्य दिले. जिल्ह्यातील बहुतेक सोयरिकी घाटावरील गावांमध्येच होताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर पुण्याशी नाळ जोडलेली आहे. साहजिकच, लग्नकार्ये किंवा सुखदुःखासाठी पुण्यातून लोक विविध मार्गाने येऊ शकतात. छुपे मार्ग अनेक सापडू शकतात; परंतु त्यांनी अशा नात्यांना सध्या बाजूला ठेवले पाहिजे. पुणे शहरात 9 मार्चपासून आजपर्यंत तब्बल 3 हजार 93 नागरिकांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील 1 हजार 630 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत; मात्र 174 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही आकडेवारी खूप मोठी आहे. पुणेकर स्वतःची चांगली काळजी घेतात. असे असूनही हा आकडा इतक्या वेगाने वाढतो आहे, यावरून अंदाज यावा. पुण्याचे लोण नगरला पोचले तर काय होईल? त्यामुळे सध्या नातं बाजूला ठेवून आपल्या सुरक्षेचे पाहा.
औरंगाबादला मराठवाड्यातच राहू द्या
नगरच्या शेजारी असलेल्या औरंगाबादमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. तेथे रोज पन्नासपेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांचा आकडा 800पेक्षा जास्त झाला आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे, पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका आदी ठिकाणच्या लोकांचे औरंगाबादच्या लोकांशी नातेसंबंध आहेत. विविध कार्यानिमित्त हे नातेवाईक जिल्ह्यात येऊ शकतात. हे टाळा. सध्या जिल्हाबंदी आहे. अशी कोणी व्यक्ती जिल्ह्यात आल्यास आपणच आपल्या नातेवाइकांना अडचणीत आणू शकतो. थेट गुन्हा नोंदविला जातो. श्रीगोंदे तालुक्यात एका व्यक्तीवर जिल्हा ओलांडल्याच्या कारणाने गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नातेवाइकांना मराठवाड्यातच राहू द्या. पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी घाट ओलांडू देऊ नका.
लग्नालाहवा तात्पुरता ब्रेक
कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनच्या काळातही काही मंडळी लग्न उरकून घेत आहेत. कमी खर्चात लग्न व्हावे, असा काहींचा उद्देश असेल, तसेच आता किती दिवस वाट पाहायची म्हणूनही अनेक लग्न होत आहेत. लग्न जमवून ठेवले की जास्त दिवस ठेवता येत नाही. कारण पुढे काही अडचणी येऊ शकतात. यामुळेही लग्न उरकून घेण्याची घाई असते. त्यामुळे जमलेले लग्न उरकून घेण्याचे नियोजन बहुतेक ठिकाणी होत आहे. काही दाम्पत्यांनी तर घरातच लग्न उरकून बाकीच्या वऱ्हाडींना ते फेसबुक लाइव्ह करून एक आदर्श निर्माण केला. शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यल्प उपस्थितांमध्ये लग्न उरकून घेण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. असे असले, तरी लॉकडाउनच्या काळात शक्य होईल तेवढे लग्न टाळणेच योग्य. कारण, कमी उपस्थितांत लग्न लावताना आपण आपल्या अत्यंत जवळच्याच नातेवाइकांना बोलावणार असतो. यांपैकी एखादा कोरोनाबाधित असल्यास सर्व वऱ्हाडी मंडळींना क्वारंटाईन होण्याची वेळ येईल. आपल्याच आप्तेष्टांना कोरोनाचा "प्रसाद' मिळेल. त्यामुळे असे समारंभ टाळणेच योग्य. आपणच आपल्या नातेवाइकांच्या अडचणींना कारणीभूत ठरू नका. अशा समारंभाला तात्पुरता ब्रेक द्या.
जिल्ह्याच्या सीमांवरील गावांनी सतर्क राहावे
सर्वच गावांमध्ये ग्रामरक्षक दले कार्यरत आहेत. काही गावांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव नाही, तर काही ठिकाणी मात्र बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. विशेषतः पुणे व औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमांवरील गावांनी विशेष सतर्कता बाळगायला हवी. नेवासे, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर, श्रीगोंदे आदी तालुक्यांना दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील गावांनी ग्रामसुरक्षा दले अधिक भक्कम करावीत. काही मंडळी परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात घुसण्यासाठी एखाद्या गावाचा कमकुवत मार्ग स्वीकारतील. नात्यांचाही आधार घेतील. त्यामुळे अशा गावांतील ग्रामसुरक्षा दलाने ठाम राहत प्रशासनाला माहिती द्यावी.
शेजारधर्म पाळा; शेजार-पाहुणा टाळा
आपल्या शेजारच्या घरी कोण येतो, कोण जातो, यावर आपले लक्ष असू द्या. नवीन माणूस अन्य जिल्ह्यातील असल्यास तातडीने प्रशासनास कळवा. कारण तोच खूप धोकादायक ठरू शकतो. इतर वेळी आपण शेजारधर्म पाळताना एकमेकांना मदत करतो; परंतु कोरोना संसर्गाच्या काळात मात्र हा शेजारधर्म बाजूला ठेवावा. एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याची संपूर्ण "हिस्ट्री' काढली जाते. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे आपले कुटुंब यापासून वाचवायचे असले, तर शेजाऱ्याच्या घरातील अशा पाहुण्याला सरकारी पाहुणचारासाठी पाठवा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम