घरे तोडण्याच्या आदेशामुळे माणगांव मधील बेलदार समाजातील दीडशे कुटुंबांनी जीवंतपणी आपल्या चिता रचून दिला आत्मदहनाचा इशारा

 बोरघर : रायगड जिल्ह्याच्या माणगांव शहरातील दत्त नगर, गजानन महाराज मंदिर परिसरातील बेलदार समाजातील सुमारे दिडशे कुटुंबांना आपली राहती घरे सात दिवसात तोडण्याच्या आदेशाची नोटीस वन विभागाने दिल्यामुळे या दिडशे कुटुंबांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही सर्व कुटुंबे प्रचंड भयभीत झाली आहेत. त्यामुळे त्यांनी जीवंतपणी आपल्या चीता रचून त्यावर सामुहिक आत्मदहनाचा इशारा वन विभागासह सरकारला दिला आहे. 
       गेली अनेक वर्षे माणगांव शहरातील दत्त नगर आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भटक्या विमुक्त बेलदार समाजातील शेकडो कुटुंबे वन विभागाच्या मोकळ्या जागेत घरे बांधून राहत आहेत. तत्कालीन माणगांव ग्रामपंचायतीने त्यांना या घरांचे असेसमेंट आणि या ठिकाणी त्यांना जीवनावश्यक भौतिक सोई सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. या कुटुंबांकडे सर्व प्रकारची कागदपत्रे असून ही सर्व कुटुंबे प्रत्येक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावतात. 
     असे असताना वन विभागाने त्यांना आता त्यांची राहती घरे स्वतः तोडण्याच्या आदेशाची नोटीस दिली असून या आदेशाच्या नोटीस मध्ये त्यांना त्यांची घरे तोडण्यासाठी केवळ सात दिवसांची शेवटची मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत त्यांनी आपली घरे तोडली नाही तर वन विभाग या ठिकाणी बुलडोझर फिरवणार आहे. त्यामुळे या दिडशे कुटुंबांवर आता नाहक बेघर होण्याची वेळ आली आहे. म्हणून ही कुटुंबे या नोटीस मुळे प्रचंड दडपणाखाली येवून अक्षरशः भयभीत झाली आहेत. 
       अहोरात्र प्रचंड मेहनतीची कामे करून पै पै आणि काडी काडी जमा करून बांधलेली घरे वन विभागाकडून तोडली जाणार आपले कुटुंब रस्त्यावर येणार मग आपण आपली लहान लहान लेकरंबाळं, वृद्ध आईवडीलांना घेऊन आपण आता कुठे जाणार ? त्यामुळे ही कुटुंबे स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि विद्यमान सरकार यांच्या कडे आपली घरे वाचवण्यासाठी अक्षरशः याचना करत आहेत. मात्र या कुटुंबांची कोणालाही दया वा कणव येत नाही.  त्यामुळे या सर्व कुटुंबांनी जीवंतपणी आपल्या चीता रचून त्यावर सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


संबंधित पोस्ट