संसार सुटला अन् पोटातली आग जगू देईना, पठ्ठ्याने निवडला अजब मार्ग की...

10 ते 15 दिवस काम करून ज्या ठिकाणी काम करत होता तिथल्या मालकाचाही मोबाईल चोरी करून तो पोबारा करत असल्याचा त्याचा नित्यक्रम झाला होता


संसार सुटला अन् पोटातली आग जगू देईना, पठ्ठ्याने निवडला अजब मार्ग की...

वाशिम (प्रतिनिधी):         घरातून बेदखल झालेल्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी एका तरुणाने जो मार्ग निवडला त्यामुळे त्याला आत थेट तुरुंगाची हवा खावी लागली. वाशिम पोलिसांनी एका 30 वर्षीय अट्टल गुन्हेगाराला अटक केली त्याच्याकडून तब्बल पावणे दोन लाखाचे मोबाईल जप्त केले आहे.

कौटुंबिक वादामुळे 7 - 8 वर्षांपूर्वी घरातून बेदखल झाल्यामुळे महेश खडसे हा तरुण कामासाठी राज्यभर फिरत होता. त्याचं शिक्षण केवळ 10 वीपर्यंत झाल्यामुळे त्याला ज्या गावात जायचा त्या भागातील एखाद्या हॉटेल मध्ये काम मिळत असे. पाहण्यात देखणा असल्याने आणिआपल्या स्वभावामुळे तो काम करणाऱ्या हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करत होता आणि त्याच परिसरातील रेल्वे स्टेशन,बस स्थानक तसंच सार्वजनिक ठिकाणावरून महागडे मोबाईल चोरी करून अगदी अल्प किंमतीत तो मोबाईल विकून टाकत होता.

10 ते 15 दिवस काम करून ज्या ठिकाणी काम करत होता तिथल्या मालकाचाही मोबाईल चोरी करून तो पोबारा करत असल्याचा त्याचा नित्यक्रम झाला होता. विशेष म्हणजे, त्याने असंख्य मोबाईल चोरले. मात्र, स्वतःतो एकही मोबाईल वापरत नव्हता. कुणाला संपर्क करायचा असल्यास त्याच्या तोंड पाठ असलेल्या क्रमांकावर तो दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून बोलत होता. त्याचा सर्व संसार म्हणजे एक चादर, एक टॉवेल आणि एक अंगावरील ड्रेस हे सोबत ठेऊन मिळेल तिथं खाणे आणि झोपणे हा त्याचा दिनक्रम होता.

राज्यातील पुणे, औरंगाबाद, अकोला आणि इतर ठिकाणी त्यानं मोबाईल चोरी केल्याचं पोलीस तपासात सांगितलंय. मोबाईल चोरण्यासोबत त्यानं मोटार सायकल ही चोरल्यानं त्याला औरंगाबाद आणि शेगांव पोलिसांनी अटक केल्याचं समजतं.

असा सापडला पोलिसांच्या ताब्यात

महेश खडसे या तरुणाची मोबाईल चोरी पकडल्या जात नव्हती. मात्र, त्याचं नशीब वाशिम शहरातील मोबाईल चोरल्यानं फुटलं. वाशिम शहरातील गायत्री भोजनालयात 6 जानेवारी रोजी महेश खडसेने नाश्ता केला आणि बिलाचे पैसे न देता हॉटेल मालक संतोष व्यास यांचा कॉउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरून नेला. त्याची तक्रार संतोष व्यास यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवनकुमार बन्सोड पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनात वाशिम शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल जाधव,नायक पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण नागरे,प्रशांत अंभोरे,विजय शिनगारे,ज्ञानदेव मात्रे,विठ्ठल महल्ले,गजानन कऱ्हाळे यांनी त्या आरोपीच्या शहरात भटकत असतांना मुसक्या आवळल्या.  तपासादरम्यान त्याच्याकडून शेलु खडसे परिसरातील एका शेतामधून पाउणे दोन लाखाचे 13 महागडे मोबाईल जप्त केले आहेत. त्याच्याकडून आणखी मोबाईल चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी मोबाईल चोरी करणे हा महेश खडसे चा नित्यक्रम झाला होता. जर तो कौटुंबिक कलहातून जर तो बेदखल झाला नसता तर इतर तरुणा सारख कौटुंबिक आयुष्य जगला असता. त्याला वाशिम पोलिसांनी अटक केल्यावर महेशला सोडवण्यासाठी कुणीही आलं नाही. त्यानं तशी पूर्व कल्पना पोलिसांना दिली होती. पण, शेवटी गुन्हा हा गुन्हा असतो. त्यामुळे आता या चोराची रवानगी थेट तुरूंगात रवानगी झाली आहे.

संबंधित पोस्ट