तुम्ही तक्रारी करा, ते फक्त ‘इशारा’ देतील!
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी प्रवाशांना खाद्यपदार्थांमधून विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे पितळ उघडे पडले आहे.
- by Adarsh Maharashtra
- Jan 09, 2020
- 1674 views
मुंबई (प्रतिनिधी) :शताब्दी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी प्रवाशांना खाद्यपदार्थांमधून विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे पितळ उघडे पडले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये पुरवण्यात येणारे खाद्यपदार्थ खासगी ठेकेदारांकडून पुरवण्यात येतात. सदर वार्ताहराने माहितीच्या अधिकाराखाली, आयआरसीटीसीकडे खाद्यपदार्थांच्या तक्रारींबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत खासगी ठेकेदारांच्या विरोधात प्रवाशांनी २१ हजार तक्रारी केल्या आहेत. मात्र केवळ ९ ठेकेदारांची सेवा खंडित करण्यात आली. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या दर्जावरून कोणत्याही ठेकेदाराची सेवा खंडित करण्यात आलेली नाही. शताब्दी एक्स्प्रेसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या केटररचे नाव 'सनशाइन केटरर्स' असे असून याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडून या आधीही करण्यात आली होती. तरीही 'आयआरसीटीसी'ने या ठेकेदाराविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही.
प्रवाशांकडून तक्रारी दाखल केल्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास प्रवाशांना असतो. मात्र आयआरसीटीसीकडून असे होताना दिसत नाही. गेल्या ५ वर्षांत २१,४६५ तक्रारीपैकी केवळ ६३२६ वेळा आयआरसीटीसीकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ६८४७ वेळा ठेकेदारांना केवळ इशारा देऊन सोडण्यात आले. ४३७१ ठेकेदारांना खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.मंगळवारी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशी आलेले ब्रेड बटर खाल्ल्यामुळे ३६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रवाशांच्या दबावानंतर अखेर सनशाइन केटरर्सची सेवा खंडित करण्यात आली.
तीन वर्षांत तक्रारींचा ओघ वाढला
रेल्वे प्रशासनाकडे पाच वर्षांतील एकूण २१,४६५ तक्रारीपैकी १७,४४४ तक्रारी गेल्या तीन वर्षांत आलेल्या आहेत. आयआरसीटीसीला सर्वाधिक तक्रारी राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांकडून प्राप्त झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत ४,६१७ वेळा राजधानी एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांबाबत तक्रारी करण्यात आल्या. यात पदार्थांचा दर्जा खराब असल्याच्या २१६५ तक्रारी आहेत.
६१६६ वेळा रेल्वेला खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी २१६५ वेळा तक्रार दाखल केली आहे.
४६१७- वेळा राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी खानपान सेवेबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.
वर्ष तक्रारी
२०१५-१६ : १८००
२०१६-१७ : १९२१
२०१७-१८ : ४८६२
२०१८-१९ : ७८६२
*२०१९ : ५०२०
(२०१९ मधील आकडेवारी ऑक्टोबरपर्यंत आहे. )
नुकतेच वाढवले भाव
खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांच्या किंमती ४० टक्के वाढवण्यात आल्या होत्या. आयआरसीटीसी बेस किचनसाठी रेल्वेकडून दुप्पट पैसे घेते. ठेकेदाराला निम्मे पैसे देण्यात येतात. रेल्वेकडून आयआरसीटीसीला खाद्यपदार्थांसाठी ११२ रुपये मिळतात. मात्र ठेकेदारांना केवळ ५६ रुपये देण्यात येतात.
भूमिका
लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये दूरच्या प्रवासासाठी खाद्यपदार्थ विकत घेणे ही प्रवाशांची गरज असते. याचा गैरफायदा घेण्यापेक्षा आयआरसीटीसीकडून प्रवाशांना योग्य सुविधा देणे गरजेचे आहे. तक्रारीवर अनेकदा कारवाई न केल्यामुळे आयआरसीटीसीमध्येच घोटाळा होत असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणी दोषींवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईर, अशी अपेक्षा आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम