
उडाण योजनेतून लवकरच सोलापूरहून हवाई वाहतूक कार्यान्वित- नरेंद्र मोदी
‘सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद’
- by Adarsh Maharashtra
- Jan 09, 2019
- 1104 views
सोलापूर: सबका साथ सबका विकास ही केंद्र सरकारची भूमिका असून त्याला अनुसरुन देशातील गोरगरीब, कामगार, मध्यमवर्गाच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी अधिक गतीने होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासह सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या 1 हजार कोटीच्या रेल्वेमार्गास मंजूरी दिल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. याशिवाय, राज्यातील 4 विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरु असून लवकरच उडाण योजनेतून सोलापूरहूनही विमानसेवा सुरु होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मल:निस्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन यंत्रणांचे लोकार्पण आणि सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित पाणी पुरवठा व स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच अमृत योजनेंतर्गत भूमिगत मल:निस्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांचे भूमीपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुद्धार मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसय्या आडम आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
भाषणाची सुरुवात मराठीतून आणि सोलापूरच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करत श्री. मोदी यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करत आणली असून ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरण आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज,पाणी आणि चांगल्या रस्त्यांसाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. काही बाबी पूर्ण झाल्या असून उर्वरित कामांनी गती घेतल्याचे, ते म्हणाले.
स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या सर्व सोईसुविधा सोलापूर शहराला मिळतील, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, देशात स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो कोटींची कामे सुरु आहेत. पुढील काही वर्षात जगातील सर्वाधीक विकसित होत असणाऱ्या 10 शहरांच्या यादीत सर्व शहरे आपल्या देशातील असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकास हेच ध्येय ठेवून केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. सबका साथ सबका विकास ही आमच्या कामाची संस्कृती आणि परंपरा असल्याचे श्री. मोदी म्हणाले.
समतोल विकास यापूर्वी देशाचे चित्र वेगळे दिसले असते, असे सांगून श्री. मोदी यांनी, पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर आमचा भर आहे. योजनांची वेळेत आणि गतीने पूर्तता करणे आणि सामान्यांसाठी त्याचा थेट लाभ मिळवून देणे याला आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सोलापूरहून उस्मानाबाद, असा चारपदरी महामार्ग राष्ट्राला अर्पण केला. यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची सोय उपलब्ध करुन देणार आहेत, भारतमाला योजनेंतर्गत अनेक रोजगाराच्या संधी युवा वर्गाला मिळाल्याचे ते म्हणाले.
देशात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे केंद्र शासनाने ठरवले आहे. गेल्या चार वर्षात 14 लाख घरे तयार झाली असून नजिकच्या काळात 37 लाख घरे पूर्ण होणार आहेत. यापूर्वीच्या काळात घरकुल तयार करण्याच्या कामांचा वेग पाहता ही गती सामान्यांना अधिक घरे उपलब्ध करुन देणारी ठरली असल्याचे श्री. मोदी यांनी स्पष्ट केले. यावेळी श्री. मोदी यांच्या हस्ते रे-नगर गृहनिर्माण संस्थेतील दोन महिला लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.
देशात आतापर्यंत जी कामे वेगाने पूर्ण झाली, ती या सरकारच्या काळातच झाली आहेत, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सध्या देशात 1 लाख 30 हजार किलोमीटरचे रस्ते तयार झाले असून गेल्या साडेचार वर्षात 40 हजार किमी रस्ते तयार केल्याचे ते म्हणाले. याशिवाय, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, चौपदरीकरण आणि विद्युतीकरण या कामांनाही गती दिल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ देशाच्या एका भागावर लक्ष केंद्रीत न करता सर्वसमावेशक विकास करण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या देशात रेल्वेबरोबरच विमान वाहतुकीलाही महत्व दिले आहे. उडान योजनेंतर्गत विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यातील झाला आहे. राज्यातील 4 विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरु असून लवकरच उडाण योजनेतून सोलापूरहूनही विमानसेवा सुरु होईल, असा शब्द त्यांनी केला.
केंद्र सरकारने कालच सामान्य वर्गासाठी कोणत्याही वर्गाचे आरक्षण न बदलता 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभेत घेतला आहे. गरीबांनाही विकासाची संधी मिळण्यासाठी आणि त्यांच्यातील अन्यायाची भावना या निर्णयामुळे संपेल. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या कामकाजाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध आहे. एक हजार कोटी रुपयांची कामे आज सुरु होत आहेत. रोजगारनिर्मिती करणारी शहरे तयार होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 450 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. उजनी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेमुळे नागरिकांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थापनामुळे उपलब्ध होणारे पाणी राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी धरणातून या प्रकल्पासाठी देण्यात येणारे पाणी सिंचनासाठी वापरता येईल.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु होत आहेत. आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांचा सर्वात मोठा प्रकल्प तयार होत आहे. या योजनेसाठी कोणत्याही अडचणी येणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांच्या सहकार्याने अमृत योजनेतून या घरांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सरकारच्या काळातच भूमिपूजन झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळाही याच काळात होत आहे. पालखी मार्गाचा विकास केल्याने लाखो वारकऱ्यांची सोय झाल्याचे ते म्हणाले. राज्याला सर्वोत्तम बनविण्याचा आमचा संकल्प असून केंद्र सरकारच्या मदतीने हे काम पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून याकामी केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी आहे. तात्काळ दुष्काळ पाहणीसाठी पथक पाठविण्यात आले. त्यांनी केंद्राकडे अहवाल सादर केला असून राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गास मंजूरी दिल्याबद्दल त्यांनी श्री. मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी, विशेषकरुन रस्ते विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा मार्ग आता तयार होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सोय होणार आहे. हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे जिल्ह्यात होत असल्याने येथील विकासाला वेग आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या आणि मोठ्या प्रमाणात होणारे ऊसाचे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी इथोनॉलचे उत्पादन घेणे आणि त्याचा वापर वाढविणे यास प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साखरेचा भाव किमान 29 रुपये राहील, असा निर्णयही घेतल्याने तो ऊस उत्पादकांसाठी दिलासा देणारा आहे.
पालकमंत्री श्री. देशमुख यांनी स्वागतपर प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रमांची माहिती देऊन केंद्र सरकार व राज्य शासनामार्फत जिल्हा विकासासाठी सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.
श्री. आडम यांनी घरकूल मंजूर करुन जलगतीने निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पगडी, घोंगडे, हस्तलिखीत भगद्वतगीतेची प्रत आणि तलवार भेट देऊन प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले. आजच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमासंदर्भातील चित्रफित यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम