राजकारणातला 'समाजकारणी'
- by ॲड. राहुल वारे
- Nov 04, 2018
- 747 views
परिवर्तन चळवळीतील विचारवंत व ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांचे दि.४ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईत निधन झाले. प्रेमानंदजी 'बाबूजी' या नावाने परिचित आणि सर्वप्रिय होते. बाबूजींच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा आणि आठवणी जागविणारा लेख शनिवार, दि.१८/०८/१८ रोजी दै.आदर्श महाराष्ट्र मध्ये प्रकाशित झाला होता. आज रुपवतेंना जाऊन ३ महिने झाले. त्यांच्या आठवणी जागवीत हा आदर्श महाराष्ट्र डिजिटलवर पुन्हा प्रकाशित करीत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर दलित आणि शोषित समाजाला एकसंघ ठेवून नेतृत्व करणारा सर्वमान्य नेता नसल्यामुळे रिपब्लिकन पक्षाची गटातटात विभागणी झाली. दुरुस्त-नादुरुस्त अशा वर्चस्ववादाच्या लढाईत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला लोकसत्ताक पक्ष जातीच्या कक्षेत अडकून एका जाती पुरताच मर्यादित राहिला. परंतु बाबासाहेबांचा वैचारिक आणि सामाजिक वारसा चालविण्याचा प्रयत्न करणारे काही मोजकेच क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे ज्येष्ठ काँग्रेस नेते मा.समाजकल्याणमंत्री दिवंगत दादासाहेब रुपवते. दादासाहेबांनी परिवर्तनवादी चळवळीतील संघटनांना आणि दलित, शोषित समाजाला एकत्र आणून संस्थात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाले. दादासाहेबांचे नेतृत्व दलित चळवळी पुरते मर्यादित नव्हते, त्यांचे राजकारण व्यापक स्वरूपाचे होते. त्यांचा हाच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वारसा 'बाबूजींने' समर्थपणे जपला आणि जातीमध्ये अडकून न पडता सर्वव्यापी राजकारण केले. बाबूजी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश समितीचे प्रवक्तेपद त्यांनी सक्षमपणे त्यांनी सांभाळले. परंतु त्यांचा मुख्य पिंड होता समाजकारणाचा. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दादासाहेबांचा वारसा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. बाबूजी हे कायद्याचे पदवीधर होते. त्यांचा कला, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय विषयांचा अभ्यास आणि या सर्व क्षेत्रातील मुक्त वावर थक्क करणारा होता. बाबूजी हे सिद्धहस्त आणि श्रोत्यांना मंत्रमुगद्ध करणारे वक्ते होते. बाबूजींचे पत्रकारिता क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान होते. 'प्रवर्तनाय' हे वैचारिक पाक्षिक त्यांनी सुरु केले. त्यांचे प्रतिगाम्यांवरील वैचारिक हल्ला चढविणारे अनेक लेख गाजले. बाबूजींनी १९८९ साली सायकलवरून कराड ते मुंबई 'भारतीय संविधान गौरव यात्रा' काढली. मे २००८ मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या जागतिक परिषदेसाठी संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सामाजिक आणि शैक्षणिक कामातील योगदानामुळे फ्रांस, जर्मनी आदी युरोपियन देशामध्ये बाबूजींना अनेक परिसंवादात आमंत्रित केले जात असे. सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असली की समाजकारण प्रभावी होते यावर बाबूजींचा विश्वास होता. परंतु निवडणुकीच्या राजकारणात मात्र ते अयशस्वी ठरले. १९७८ साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर चेंबूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. निवडणुकीत अपयश आले तरी ते कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अपवाद फक्त २००९ सालच्या शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीचा. रामदास आठवलेंच्या स्वार्थी हटवादी भूमिकेमुळे बाबूजींना काँग्रेसनी उमेदवारी नाकारली. बाबूजींनी बंडखोरी केली, पण ही बंडखोरी स्वार्थासाठी नव्हती. आयुष्यभर सर्वव्यापी राजकारण करणारे बाबूजींही जातीपातीच्या राजकारणाचे बळी ठरले. ते शिवसेनेत जाणार अशा अनेकांनी वावड्या उठवल्या होत्या, परंतु बाबूजी त्यांच्या वैचारिक भूमिकेवर ठाम होते. बाबूजींनी कधीही काँग्रेस पक्षाशी प्रतारणा केली नाही. बाबूजींनी बहुजन शिक्षण संघ, दादासाहेब फाउंडेशन, बालकल्याणी आणि चेतना संस्थांद्वारे आपली समाज कार्ये अविरतपणे सुरु ठेवले. बाबूजींच्या निधनाने वंचित,शोषित आणि सर्वहारा समाजाचा एक संघर्षशील नेता हरपला.
Writer
कार्यकारी संपादक :- दै.आदर्श महाराष्ट्र