आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वतयारी पूर्ण - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

  मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून इव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज दिली.

   विधानसभा निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी श्री. सिंह यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी‍ शिरीष मोहोड, अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक‍ अधिकारी आबासाहेब कवळे उपस्थित होते.

   हा पत्रकार संवाद केवळ निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी असून निवडणूक तारखा जाहीर होण्याशी काहीही संबंध नाही असे  प्रारंभीच स्पष्ट करत श्री. सिंह यांनी मतदार यादी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदींबाबत यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर दि. 31 ऑगस्ट, 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. असे असले तरी नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापूर्वी 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येत असल्याने यापूर्वी नोंदणी करु न शकलेल्या मतदारांना अजूनही मतदार नोंदणीची संधी आहे, असेही ते म्हणाले.

   31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदार असून त्यामध्ये 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला आणि 2 हजार 593 तृतीयपंथी मतदार आहेत. 15 जुलै, 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार 4 कोटी 63 लाख 27 हजार 241 पुरुष, 4 कोटी 22 लाख 57 हजार 193 महिला आणि 2 हजार 527 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 85 लाख 86 हजार 961 मतदार होते. 15 जुलैनंतर नंतर मतदार यादीमध्ये सुमारे 10 लाख 75 हजार 528 इतके नवीन मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत; तर 2 लाख 16 हजार 278 इतके मतदार वगळण्यात आले आहेत.

 विहित केलेल्या कार्यपध्दतीचे पालन करुन मयत, अन्यत्र स्थलांतरीत, किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीतील तसेच वगळण्यात आलेल्या नावांची यादी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदारांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तेव्हा मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी आणि वगळण्यात आलेल्या नावांबाबत समस्या असल्यास पुन्हा योग्य पुराव्यांच्या आधारे मतदार नोंदणी करुन घ्यावी. ऑनलाईन मतदार नोंदणी तसेच  यादीतील तपशिलात  बदल करण्यासाठी  ऑफलाईनबरोबरच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध असून www.nvsp.in या संकेतस्थळाचा त्यासाठी  वापर करावा.

  राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यामध्ये 4 हजार 144 मतदान केंद्रांच्या वाढीसह एकूण 95 हजार 473 मतदान केंद्रे होती. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात येत असून लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या 700 ते 800 ने वाढण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुलभ निवडणूका’ (ॲक्सेसिबल इलेक्शन्स) या घोषवाक्यानुसार अपंग मतदारांसाठी सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने पहिल्या किंवा त्यापेक्षा वरच्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रांना तळ मजल्यावर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

  आगामी विधानसभा निवडणुकांसाठी यंत्रणेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच पुरेशा संख्येने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे मतदान केंद्रांच्या तुलनेत बॅलट युनिट 175 टक्के, कंट्रोल युनिट 125 टक्के आणि व्हीव्हीपॅट 135 टक्के इतकी उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. सर्व इव्हीएमचे प्रथम स्तरीय चाचणीची (फर्स्ट लेव्हल चेक) कार्यवाही पूर्ण झाली असून याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

पूरग्रस्तांची मतदार ओळखपत्रे मोफत उपलब्ध करुन देणार

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.

*पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे :

 ·         इव्हीएम पूर्णत: सुरक्षित, सक्षम आणि दोषविरहीत असून कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे त्याची सुरक्षितता भेदता येणे अशक्य आहे. त्याला सुरक्षिततेचा हाएस्ट सेक्युरिटी प्रोटोकॉल आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये देखील या यंत्रणेला योग्य ठरविण्यात आले आहे. मात्र तरीही या यंत्रणेबद्दल काही घटकांकडून अपप्रचार केला जात आहे, ही बाब योग्य नाही. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये.

·   सर्व मतदान केंद्रावर आवश्यक पाणी, वीज, शौचालय आदी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

· गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲप, राजकीय पक्षांना विविध परवानग्या देण्यासाठी सुविधा पोर्टल, 1950 हा मतदार मदत क्रमांक या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

·    राज्य सरकारचे आपले सरकार या संकेतस्थळावर निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीदेखील संबंधित निवडणूक कार्यालयाकडे वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट