मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे आवाहन!

रायगड(धर्मानंद गायकवाड)- मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांकडून अर्ज केले जात असून, दि.3 नोव्हेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर 2 हजार 385 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विभागाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2022-23 या वर्षाकरिता प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही प्रणाली आणली आहे. विद्यार्थ्यांनी विहीत वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील 2 हजार 355 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभाग तर विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गास इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जाती प्रवर्गातील 560 तर विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गाचे 1 हजार 795 अर्ज प्राप्त झाले आहेत.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अडचण येऊ नये, याकरिता प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या समान संधी केंद्रात एका प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, फ्रीशिप शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. उत्पन्न व प्रवर्गावर आधारित शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. अन्य शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येतो.

महाविद्यालयांनी कार्यवाही करावयाचे वेळापत्रक: दि.1 नोव्हेंबर ते दि.15 नोव्हेंबर 2022 मध्ये द्वितीय, तृतीय, अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे सन 2022-23 वर्षाकरिता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे व दि.20 नोव्हेंबर ते दि.30 नोव्हेंबर 2022 मध्ये नविन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी करून घेणे.

2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मागील महिन्या-पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील 23 हजार अर्ज येणे अपेक्षित असून केवळ 2 हजार 355 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट