पोलिसांना पाहून पळून जाणं जीवावर बेतलं, 'त्याला' मृत्यूने गाठलं

बारामती : अवैध दारू विक्री करत असल्याच्या संशयावरून धरपकड करत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातल्या सोनगाव येथे घडली आहे. दरम्यान, वृद्ध झालेल्या व्यक्ती अपंग असून पोलिसांनी मारहाण केल्याने घाबरून पाण्यात उडी मारल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मंगलेश उर्फ बहिऱ्या अशोक भोसले (वय ४५ राहणार सोनगाव ता. बारामती जि. पुणे) असे मृताचे नाव आहे. या घटनेत पोलिसांवर देखील हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबतच्या वृत्ताला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पोलीस पथकाने सोनगाव येथील पारधी वस्तीत सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापेमारी केली. त्यावेळी अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची धरपकड करत असताना मयत झालेला मंगलेश उर्फ अशोक भोसले याच्या दिशेने पोलीस धावले.

त्यावेळी घाबरून जाऊन त्याने लगत असलेल्या नीरा नदीच्या पाण्यात उडी मारली. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला अर्धांगवायूचा झटका आलेला होता त्यामुळे त्याला नदी पार करून पोहता आले नाही. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी देखील पोलिसांवर आक्रमकपणे हल्ला करत पोलिसांच्या गाड्यांची मोडतोड केली. तसेच पोलिसांना देखील मारहाण झाली आहे. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. दुसरीकडे मृताचे नातेवाईक आक्रमक झाले होते. मात्र, त्यांची समजूत घालून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

गेल्या आठवड्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेत नाराजी व्यक्त करुन बारामती तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत सर्व अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई सुरू केली होती.

या कारवाई दरम्यान दारू विक्री करणाऱ्या एका संशयिताचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या कारवाईला खिळ बसणार की आणखी आक्रमकपणे कारवाई सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे?

मात्र, पोलिसांनी केलेल्या या संपूर्ण कारवाईमुळे बारामती परिसरात हातभट्टी लावणाऱ्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. कारण आता हे सर्व गोरखधंदा करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

संबंधित पोस्ट