पाणी हेच जीवन..पाणी जपून वापरा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे न्हावा-शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन
- by Adarsh Maharashtra
- Feb 22, 2021
- 997 views
अलिबाग, दि.22, (जिमाका)- सध्या राज्य देश संपूर्ण जग कोरोनासारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे त्याचबरोबर पाण्याची टंचाई देखील मोठी समस्या आहे पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील नाव्हाशेवा टप्पा तीन पाणी पुरवठा योजना भूमिपूजन सोहळा झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, पंचायत समिती पनवेल सभापती देवकी कातकरी, ग्रामपंचायत खानावळे सरपंच जयश्री नाईक, ग्रामपंचायत बारवाई सरपंच नियती बाबरे, जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, निधी चौधरी, पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आयोजकांना धन्यवाद देतो. कालच मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेमाने आणि हक्काने सूचना दिल्या. सार्वजनिक कार्यक्रम करू नका. परंतु रायगड येथील कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि मुख्य म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. सर्व नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला आहे. त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन.
पाणी म्हणजे आयुष्य आहे. विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत. उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू. माणूस तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही खूप खोल जात आहे. मी जव्हारला गेल्या आठवड्यात गेलो होतो, ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य काय असते, ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पहायला मिळते. तेथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्गसंपदा आहे. समुद्र किनारे आहेत. पर्यावरणाला धोका पोहोचवून केलेला विकास आपल्याला नकोय. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन कारखाने उभारावेत, मात्र त्यासाठी वनसंपदा नष्ट करता कामा नये, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत, अशी चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, मुंबई लगतच्या या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढते आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत नव्हे तर वेळेआधी पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. केवळ रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असा निर्धार श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जगामध्ये यापुढील भांडणे पाण्या साठीच होतील, राज्याराज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात पाण्याकरिता वाद होऊ नयेत यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाययोजना करणे, लोकांनी जलसाक्षर बनणे, ही काळाची गरज बनली आहे. कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे.त्यामुळे सर्वांनीच काटेकोरपणे आपली,आपल्या कुटुंबाची,समाजाची काळजी घ्यावी.
जनतेने नियमांचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही, सध्याच्या परिस्थितीला लोकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट बनण्याआधीच आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील न्हावाशेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेसंबंधी कामाचा दर्जा उत्तम राखावा, काम वेळेत पूर्ण करावे आणि त्या कामात कुठलीही उणीव राहणार नाही, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश श्री.पवार यांनी दिले.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासनाच्या अथक प्रयत्नामुळे कोविड-19 रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता ती पुन्हा वाढत आहे. त्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राकडून 40 हजार कोटी येणे बाकी असले तरीसुद्धा जनतेच्या हिताचे आणि राज्याच्या विकासासाठी असलेले प्रकल्प चालूच आहेत. आर्थिक अडचण भासत असली तरी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही. हा प्रकल्प दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. प्रकल्प निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काळजी घ्यावी. प्रकल्प निर्मितीसाठी नगर विकास विभागातून लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही श्री.शिंदे यांनी केल्या.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठमोठी धरणे महाराष्ट्रात उभी केली आहेत. मोरबे धरण हे सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभे केले आहे. न्हावाशेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी आनंद व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत योजनेचे भूमीपूजन झाले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे यांनी प्रास्ताविकात या योजनेविषयीची विस्तृत माहिती दिली. सूत्रसंचालन धनश्री प्रधान यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम