पालिका आयुक्तांनी बोलावल्यानंतरही बैठकीला गैरहजर राहणे अधिकाऱ्याला महाग पडले; अनधिकृत बांधकामांना अभय देणे भोवले दुय्यम अभियंता सोमेश शिंदेवर निलंबनाची कारवाई.

मुंबई : वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पालिकेच्या वर्तुळात चांगलाच गाजला असून एका अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वर्सोवा येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणे, वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही अनधिकृत बांधकामे न पाडणे, बैठकांना हजर न राहणे, कार्यालयात न येणे अशा अनेक तक्रारींमुळे के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांचीही बदली करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या समक्ष बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना दिल्यानंतरही शिंदे गैरहजर राहिल्यामुळे त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे.

अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमचा समावेश असलेल्या के पश्चिम विभागात २०२२ पासून कार्यरत असलेले दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५९, ६० आणि ६३ यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ५९ आणि ६३ मध्ये अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात व दलदलीच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या. सोमेश यांना प्रत्यक्ष बोलावून संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र शिंदे यांनी या सगळ्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ३१ मेपासून वर्सोवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार होती. त्यात शिंदे यांनी कुचराई केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ५ जून रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी सोमेश शिंदे आणि पदनिर्देशित अधिकारी स्वप्निल कोळेकर यांना के पूर्व विभाग कार्यालयात बैठकीसाठी बोलावले होते. मात्र सोमेश शिंदे या बैठकीस गैरहजर राहिले आणि महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे त्यांनी उल्लंघन केले. त्यामुळे या प्रकरणाला एकूणच गंभीर वळण आले असून शिंदे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, वेसावे येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीने विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

कारवाईच्या ठिकाणी वातानुकूलित गाडीत बसून राहिले

वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामे पाडण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने के पश्चिम विभागाला दिले होते. ३ जून २०२४ रोजी कारवाई नियोजित होती. त्याबाबत निर्देश मिळाल्यानंतरही सोमेश शिंदे यांनी कारवाईसाठी कोणतीही तयारी केली नाही. एवढेच नव्हे तर ३ आणि ४ जून २०२४ रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त व इतर सहकारी प्रत्यक्ष घटनास्थळी भर उन्हात उभे राहून दिवसभर कारवाई करीत असताना सोमेश शिंदे खासगी वाहनात वातानुकुलन यंत्रणा सुरू करून चक्क बसून राहिले. कारवाई पूर्ण होण्याआधीच ते निघून गेले. ही निष्कासन कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती व तोवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट