
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक अभ्यास दौरा!
- by Dharamanand Gaikwad
- Jan 25, 2023
- 177 views
कर्जत ;- युनायटेड वे मुंबई, जल संजीवनी कर्जत प्रकल्पद्वारे कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा, खांडस, नांदगाव, वारे आणि पाथरज ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय कालावधीत शेती विषयक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. एकूण 38 शेतकऱ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी आयोजित केलेल्या ‘कृषिक’ या कृषि प्रदर्शनास भेट देण्यात आली. ह्या अभ्यास दौरा मागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, पिक प्रात्याक्षिके, सूक्ष्म सिंचन पद्धत, सुधारित औजार वापर, सेंद्रिय शेती तसेच शेती पूरक व्यवसाय ज्यात मधमाशी पालन, मत्स्यपालन, कुक्कुट पालन, मशरूम उत्पादन, अझोला उत्पादन आदी संदर्भात माहिती घेऊन त्याचा वापर करून आर्थिक उत्पन्न कसे वाढविता येईल ह्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आला.
अभ्यास दौऱ्याचा दुसरा दिवस युनायटेड वे मुंबई संस्थेने सोलापूर येथील बार्शी तालुक्यातील सुर्डी आणि इतर गावात लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणची कामे, शेतकरी उत्पादक कंपनी भेट, मल्टीलेयर शेती आणि शेततळे यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. युनायटेड वे मुंबईचे प्रतिनिधी भीमाशंकर ढाले आणि अजीज तांबोळी यांनी शेतकऱ्यांना लोकसहभागाने केलेल्या कार्याची माहिती दिली. शेतकऱ्यांनी दौऱ्याहून परतल्यानंतर आपल्या आणि गावाच्या विकासासाठी कशा पद्धतीने या दौऱ्याचा उपयोग करून घेता येईल या संबंधी मधुकर डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम सुरु असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युनायटेड वे मुंबईचे मुकेश देव (प्रकल्प व्यवस्थापक - सामाजिक प्रभाव) यांनी केले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम