कीर्तनकारांचा राजकीय 'तमाशा'....!

 जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
--------------------------------------------------------------------

साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाहय ॥१॥
लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥
एकांती लोकांतीं स्त्रियांशीं भाषण। प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥
तुका म्हणे ऐशा साधनीं जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥


संत शिरोमणी तुकोबारायांनी संतांचे आणि कीर्तनकाराचे चारित्र्य कसे असावे याचे केलेले परखड वर्णन दोन्ही अभंगांतून दिसून येते. मात्र सध्या बाजारबुणग्या तथाकथित संतांचा आणि कीर्तनकारांचा सगळीकडे हैदोस सुरु आहे. त्यामुळे संत कोणासी जाणावा आणि कीर्तनकार कोणासी म्हणावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकोबाराया, गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार, मुक्ताबाई, कान्होपात्रा ते तुकडोजी महाराज, गाडगेबाबा या सगळ्या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, प्रबोधनात्मक वैचारिक बैठक घालून दिलेली आहे. तुकोबारायांनी सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धेवर अभंगाच्या माध्यमातून जोरदार लत्ताप्रहार करीत आपल्या कृती व उक्तीतून समाजाला मार्गदर्शन केले, सामान्यांना सौदार्ह्याचा मार्ग दाखवला, यामुळे जात,धर्म यांची बंधने गळून पडली व स्त्री, शूद्र आणि अठरापगड जातीजमातींना  भागवत धर्मात एकवटून घेतले. भक्ती, शक्ती आणि ज्ञान या तत्वांवर आधारित समतेचं तत्त्वज्ञान सांगणारा भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय हे या संतांची महाराष्ट्राला देण आहे.
 दोन माणसं एकत्र भेटल्यावर स्त्री, पुरुष, शूद्र असा कोणताही भेद न करता एकेमकांच्या पाया पडून एकेमकांविषयी आदर दाखविणे ही खरी वारकरी परंपरा आहे म्हणून वारकरी हा सात्विक, समानता, बंधूंभाव व आदरभाव जपणारा समतेचा वाहक मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तथाकथित भागवत संप्रदायाचे पाईक म्हणविणाऱ्या वारकऱ्यांना संतांच्या शिकवणीचा पूर्णपणे विसर पडलेला दिसतो. या मंडळींचं आचरण आणि वर्तन हे वारकरी संप्रदाय परंपरेच्या पूर्णतः विरोधात आहे. एका महिलेला लक्ष्य करून तिची अंत्ययात्रा काढणे आणि तिची अश्लाघ्य भाषेत हेटाळणी करणे हे संतांच्या शिकवणीला हरताळ फासणारे आहे. या मंडळींना वारकरी म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. ही मंडळी वारकऱ्यांसारखे वागत नसून एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत.
 वास्तविक सुषमा अंधारे गेली वीस वर्षाहून अधिक काळ आपल्या भाषणाने महाराष्ट्राचे प्रबोधन करीत आहेत पण तेव्हा त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही कारण ती कोणालाही राजकीय सोयीची नव्हती पण अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि परिस्थिती बदलली. सुषमा अंधारेंच्या रूपाने एक नवा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा शिवसेनेला मिळाला आणि त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे नैराश्य आलेल्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. मुख्य धारेतल्या माध्यमांसाठी उपेक्षित असणाऱ्या सुषमा अंधारे आता माध्यमांच्या गळ्यातला ताईत बनू लागल्या हे भाजपला रुचणारे नाही कारण सुषमा अंधारे फक्त शिवसेनेची बाजू मांडत नसून आपल्या प्रत्येक भाषणात शाहू, फुले आंबेडकरांचा विचार मांडताना दिसत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार आणि तोही शिवसेनेसारख्या व्यासपीठावरून मांडले जाणे हे सनातन्यांना धोकादायक वाटत आहे म्हणून त्याचा धसका घेत अंधारेंना लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या जुन्या वक्तव्यांवरून वाद काढून त्यांना बदनाम करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. वैचारिक पातळीवर थेट सामना करण्याची पात्रता नसल्यामुळे संघ आणि त्यांच्या पिलावळीने अंधारेंच्या खाजगी आयुष्याला चव्हाट्यावर आणून त्यांच्या विभक्त पतीचा वापर करत त्यांना बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे हताश झालेल्या संघ्यांनी अज्ञानी वारकऱ्यांच्या खांदयावर बंदूक ठेवून अंधारेंना लक्ष्य करण्यास सुरवात केली. सुषमा अंधारेंचा १३ वर्ष जुना व्हिडीओ वायरल करून थयथयाट करणारे तथाकथित वारकरी हे मुळात वारकरी नसून जाती धर्मात भेदाभेद करून समाजात विखार पेरणारे धारकरी आहेत. वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करून हि मंडळी शिवरायांचा महाराष्ट्र धर्म बुडवू पाहत आहेत. मात्र हा महाराष्ट्र धर्म बुडविणे इंद्रायणी नदीत बुडवलेल्या तुकोबांच्या गाथे इतका सोपा नाही. हा महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवराय, महात्मा फुलें, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांनी निर्माण केलेला आहे.  
वास्तविक सुषमा अंधारे यांनी मांडलेल्या विचारात काहीच वावगं नसून उलट ते सत्याच्या कसोटीवर उतरणारे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले पण इथल्या व्यवस्थेने बहुजन समाज अन् समस्त स्त्री वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवले. या वक्तव्यात माऊलींचा अपमान कोठेही झालेला दिसत नाही, उलट अंधारेंनी तत्कालीन समाजाचे वास्तवच मांडले आहे. माऊलींनी भिंत चालवली आणि रेड्याच्या तोंडून वेद वदविले असे कल्पित आणि अवैज्ञानिक दावे करण्यापेक्षा इथल्या वारकऱ्यांनी माऊलींनी जिवंत समाधी घेतली कि त्यांना घ्यायला लावली आणि संत तुकाराम महाराज यांना जिवंतपणी सदेह वैकुंठाला कसे व कोणी पाठविले? त्यांचे अभंग व गाथा इंद्रायणीत कोणी व कशा बुडविल्या या प्रश्नाचे उत्तर देऊन समाजाचे प्रबोधन करणे अपेक्षित आहे. सत्य निर्भीडपणे सांगणे ही संतांची परंपरा आहे मात्र इथे सत्य सांगणाऱ्या सुषमा अंधारेंनाच संतपरंपरेच्या विरोधात ठरविले जात आहे. माऊलींनी जिवंतपणी घेतलेली समाधी अन् तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठाला पाठवले जाणे या दोन्ही गोष्टींनी सिद्ध होते कि संतांना सनातनी लोकांकडून किती छळ सोसावा लागला होता.
खरंतर सुषमा अंधारेंनी या तथाकथित वारकऱ्यांची माफी मागण्याची काही आवश्यकता नव्हती कारण माफी मागितल्याने त्यांची हिंमत वाढत गेली आहे. खरंतर संत व वारकरी संप्रदायाने अध्यात्मासोबतच समाजातील वाईट चालीरितींवर आसूड ओढण्याचे काम किर्तनाच्या माध्यमातून आजपर्यंत केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून वारकरी संप्रदायात धंदेवाईक कीर्तनकारांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. काही लोकांनी याला पैसा कमावण्याचा व्यवसाय बनविला आहे. कीर्तनकार स्टॅन्ड अप कॉमेडियन सारखा हावभाव करू लागला आहे त्यामुळे कीर्तनासाठी लाखोंच्या सुपाऱ्या मोजल्या जात आहेत. कीर्तनाचा बाजार झाला असून कीर्तनाला जणू तमाशाचे स्वरूप आले आहे. वारकऱ्यांमधला सात्विकपणा नष्ट होऊन त्याची जागा थिल्लरपणाने घेतला आहे. सुनीता आंधळे नावाच्या स्त्री कीर्तनकाराने सुषमा अंधारेंवर टीका करताना कुत्री असा उल्लेख केला तर काहींनी त्यांची अंत्ययात्रा काढत, शिव्यांची लाखोली वाहिली आहे. एखाद्या स्त्रीला कुत्री म्हणत शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या आणि अंत्ययात्रा काढणाऱ्या कीर्तनकारांनी आपण किती नीचपणाची पातळी गाठू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे स्वतःला वारकरी, कीर्तनकार म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार त्यांना राहिला नाही.
प्रबोधनकार म्हणाले होते की मी कट्टर हिंदू आहे पण मी शेंडी जानव्यातला हिंदू नाही तर बहुजनवादी हिंदू आहे. सुषमा अंधारेंना वारकरी संप्रदायाच्या आडून कोण विरोध करतय हे शिवसेनेतील बहुजन हिंदूंनी नीट समजून घेतलं पाहिजे. आज भागवत संप्रदायात सनातन्यांनी शिरकाव केला असून भागवत धर्माच्या समतेच्या तत्वांना समूळ नष्ट करून धर्मांधता पसरविण्याचा त्यांचा कुटील डाव यशस्वी होताना दिसत आहे. नामदेव महाराजांपासून ते तुकोबारायांपर्यंत सर्व संतांनी सनातनी प्रवृत्तीस विरोध केला मात्र आज त्यांचे वारकरी या सनातनी प्रवृत्तीला बळ देण्याचे काम करत आहेत. या सनातनी प्रवृत्तींविरोधात सर्वानी एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे आणि या लढाईत सुषमा अंधारेंना एकटे न पडू देतां शिवसेनेसोबतच पुरोगामी आणि आंबेडकरवाद्यांनीही राजकीय मतभेद दूर ठेवून सुषमा अंधारेंना खंबीरपणे साथ द्यायला हवी.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट