आभासी नात्यांचा विळखा ...!

स्मार्टफोन व इंटरनेटच्या अतिवापरामुळे वास्तव जग हे आभासी जगाच्या आहारी गेले असून आपण या आभासी जगात गुरफुटून जात आहोत. हे आभासी जग आपल्या आयुष्यावर पूर्णपणे ताबा मिळवू पाहत आहे, त्यामुळे वास्तवाच्या जाणिवेपासून आपण खूप दूर निघून जात आहोत. वास्तविक पाहता इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. पण या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाने एकूणच समाजजीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. आता समाज माध्यमं फक्त वैचारिक संवादाचं साधन राहिलेल नसून दुष्ट प्रवृत्ती आणि विकृतीचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे या आभासी माध्यमांच्या आव्हानाला पेलायचे कसे, असा यक्षप्रश्न आता आपल्यापुढे आ-वासून उभा आहे.

कोविड काळात  झालेल्या टाळेबंदीमुळे या आभासी जगाची व्याप्ती आणि मर्यादा वाढत गेली.  या आभासी दुनियेच्या मायाजालात मानवी विश्व पूर्णतः अधीन गेलं असून आभासी सुखात रमणाऱ्या भावनिक गुंतागुंतीच्या खोल गर्तेत अडकलेल्यामुळे वास्तवातील नात्यांमधला दुरावा वाढत चालला आहे. डेटिंग अ‍ॅप्स, सोशल अ‍ॅपच्या माध्यमातून जुळलेले आभासी नाते वास्तविक जीवनातली सुख-शांती नष्ट करू पाहत आहे. तरी आपण या आभासी दुनियेच्या आसक्तीत इतके बुडत चालले आहोत कि स्वप्नरंजनातच आपले सुख मानू लागलो आहोत.

शाळकरी मुलामुलींपासून ते वार्धक्याच्या उंबरठयावर असलेले स्त्री-पुरुषही या मायाजालात पूर्णपणे अडकले जात आहेत. खरंतर पौगंडावस्थेतल्या, तारुण्याच्या उंबरठयावर प्रवेश केलेल्या मुलामुलींची भावनिक गुंतागुंत अतिशय नाजूक असते, त्यात आजच्या काळात आईवडील दोघेही कमावते असल्यामुळे मुलामुलींना हवा तसा वेळ त्यांना देता येत नाही. त्यामुळे तारुण्यातलं त्यांचं चंचल मन कधीही न भेटलेल्या पार्टनर सोबत जुळलेल्या आभासी नात्याला जीवनाचा अविभाज्य भाग समजून त्याच्यावर अतिविश्वास ठेवू लागतं. पुढे नात्यातल्या खाजगीपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या जातात, आणि नंतर बळी पडतं ते फसवणूक, शोषण, ब्लॅकमेलिंग आणि खून अशा घटनांना ! सध्याचे बहुचर्चित आफताब-श्रद्धा प्रकरण यातूनच घडलं आहे. आफताब-श्रद्धा यांची भेटही एका डेटिंग अ‍ॅपद्वारे झाली होती. बंबल या अ‍ॅपद्वारे आफताब आणि श्रद्धा यांची भेट झाली. श्रद्धाला आफताबची आभासी व्यक्तिरेखा इतकी आवडली की ती त्याच्या प्रेमात पडली. ते एकमेकांना भेटले, दोघांमध्ये नाते निर्माण झाले. श्रद्धा आफताबवर एवढा विश्वास ठेवू लागली की तिने आफताबसाठी आपले कुटुंब सोडले, पण या विश्वासाच्या बदल्यात आफताबने श्रद्धाला असा भयानक मृत्यू दिला की सगळ्यांचाच थरकाप झाला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची केवळ हत्याच केली नाही तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे फक्त श्रद्धाच्या शरीराचे नव्हते तर तिच्या प्रेमाचे, विश्वासाचे होते.

 भारतात अशी १०० हून अधिक डेटिंग अ‍ॅप्स आहेत ज्यावर जोडीदार शोधले जातात. सर्वेक्षणानुसार, देशात १० कोटींहून अधिक मुले-मुली डेटिंग अ‍ॅपवर आहेत. त्यातही मध्यम वयाच्या स्त्री-पुरुषांची संख्या ४ कोटीहून अधिक आहे. मात्र यातून होणाऱ्या लैंगिक आणि आर्थिक शोषणाला बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या ९० टक्के आहे. पुरुषांनाही आजकाल सेक्सटॉर्शनच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. पण भारतात पुरुषसत्ताक पद्धतीची मानसिकता असल्यामुळे पुरुषांना या मनस्तापाची दाहकता कमी बसते. परंतु यात सर्वात जास्त मानसिक त्रासाला समोरे जावे लागते ते स्त्रीला...सोशल मीडिया किंवा डेटिंग अ‍ॅप्सवर वखवखले लांडगे सावज टिपण्यासाठी सापळा लावून बसलेले असतात आणि सापळ्यात अलगद अडकतात त्या वास्तविक आयुष्यातील प्रेम संबंधांमध्ये यशस्वी नसलेल्या, वैवाहिक आयुष्यात मानसिक, लैंगिक सुखात समाधानी नसलेल्या स्त्रिया..!  आणि मग सुरु होते वास्तविक आयुष्याची फरफट ! वास्तविक जीवनातील नाते सोडून कल्पनारम्य नातेसंबंधांमध्ये रमून जाणे आयुष्याच्या मुळावर उठतं कारण या वास्तविक आयुष्यात आपण जसे आहोत त्याच्या उलट किंवा वेगळीच प्रतिमा सातत्याने उभी करता येणे आपल्याला शक्य नसते. आयुष्यातील चिंता आणि समस्यांपासून पळून जात कल्पनाविलासी जगात गुंतणे हा सुखी जीवनाचा मार्ग होऊ शकत नाही कारण क्षणिक सुखाचं हे कल्पनारम्य जग मानसिक दृष्ट्या अत्यंत घातक असतं. यामुळे आपण कोण आहोत ही आपली मूळ ओळख हरवून बसण्याचा धोका निर्माण होतो आणि नैराश्‍य, वैफल्य यायचा संभव निर्माण होतो. जवळच्या नात्यांशी संबंध तुटतो. या कल्पनारम्य आभासी दुनियेमुळे आपल्या वास्तववादी जीवनातल्या कोणत्याही इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही, उलट पदरी पडत ते फक्त तणाव, चिंता, वैफल्य, नैराश्य..! 

 क्षणभंगुर आनंदाचे सुख मिळविण्याच्या नादात आयुष्याचे सुख, समाधान, शांती गमावून बसण्यापेक्षा मनावर नियंत्रण ठेवून या आभासी दुनियेतून वास्तवात जगावे लागेल. नाहीतर त्याची परिणती आयुष्याची राखरांगोळीत होणार असेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. या आभासी दुनियेत सर्वच जण लबाड असतात असे नाही पण या डेटिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून गुन्ह्यांचा आलेख खूप वाढता आहे हे सत्य नाकारता येणार नाही. वास्तविक, हे आभासी विश्व आपल्या बुद्धीत केमिकल लोचा करून मानसिक अस्थैर्याकडे किंवा आजाराकडे नेऊ पाहत आहे  त्यामुळे अशा प्रकारच्या आभासी विश्वाच्या विळख्यात न अडकता त्यापासून दूर राहणे हाच त्यावरचा उपाय आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट