मुंबई सुवर्णकार संघात नाना शंकरशेट यांना आदरांजली

मुंबई : सुवर्णकार संघाच्या वतीने मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार भारतीय रेल्वेचे जनक, थोर समाजसेवक नामदार नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेट यांची १५७ वी पुण्यतिथी मुंबई सुवर्णकार संघ चौक, मुंबई सुवर्णकार संघाचे कार्यालय जव्हेरी बाजार येथे आयोजित करण्यात आली होती. आदरांजली वाहण्यासाठी सुवर्णकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये दीप प्रज्वलन मा. सरचिटणीस अदीप वेरणेकर व रवींद्र देवरुखकर यांनी केले तर अमोल नारकर व गुरुनाथ भाटकर यांनी नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण केला.

नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेट यांच्या  स्मृतिना आदरांजली वाहताना मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस अदीप वेर्णेकर यांनी नानांच्या विषाल कार्याचा आढावा घेताना दूरदृष्टी असलेल्या नानानी त्या काळात मुंबई नगरीच्या भविष्याचा संपूर्ण विचार केला होता असे प्रतिपादन केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिक्षणाशिवाय समाजाची उन्नती होणार नाही हे जाणून नानानी सर्वप्रथम महिलांसाठी शाळा आपल्या गिरगांव येथील वाड्यात सुरू केली. भविष्यात लोकसंख्या वाढणार याचा संपूर्णपणे विचार करून नानानी ब्रिटिशांकडे पाठपुरावा करून भारतीय रेल्वेची स्थापना केली व रेल्वेचे पहिले कार्यालय नानानी कोणत्याही तऱ्हेचा विचार न करता आपल्या वाड्यात सुरू करण्यास ब्रिटिशांना परवानगी देताना केवळ जागाच न देता नानानी रेल्वेसाठी आर्थिक मदत केली. अशा या महान व्यक्तीचे कार्य विशाल असतानाही नाना शंकर शेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनल देण्याबाबत केंद्र सरकार करत असलेल्या दिरंगाई बद्दल जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुवर्णकार संघाच्या विविध विभागामार्फत स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा आरंभ आज करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला खास रत्नागिरीहून चंद्रकांत शां. नारकर, सुवर्णकार प्रभातचे संपादक सुनील देवरुखकर, प्रकाशक मुद्रक सत्यविजय मोंडकर उपस्थित होते. यावेळी अनेक उपस्थितानी नाना शंकरशेट यांना आदरांजली वाहिली व यावेळी दोन मिनिटे शब्द उभे राहून नाना शंकरशेट यांच्या स्मृतिना आदरांजली वाहण्यात आली. छायाचित्रणाचे काम अमरनाथ घोसाळकर यांनी चोख बजावले.

यावेळी अदीप वेरणेकर, सुनील देवरुखकर, सत्यविजय मोंडकर, अमरनाथ घोसाळकर, गुरुनाथ भटकर, विठ्ठल ताटोला, रवींद्र कृ. देवरुखकर, चंद्रकांत नारकर, पीयूष साने, रमेश सागवेकर, उदय पाटणकर, राजेंद्र देवरुखकर, अशोक साने, अमोल नारकर, मितेश नारकर, सागर साने, संतोष मुरकुटे, संतोष सागवेकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित पोस्ट