बीड मध्ये आमदारांच्या गाडीवरील ११ हजाराचा दंड जागेवर वसूल

बीडटू व्हीलर असो की फोर व्हीलर पोलिसांचा ससेमिरा चुकून प्रवास करणे तसे कठीणच पण हे पोलिस केवळ तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्यांनाच दंड करतात आणि झालेला दंड वसूल करतात असं नाही तर माजलगाव पोलिसांनी चक्क आमदाराची गाडी अडवली आहे.गाडीत आमदार नव्हते मात्र त्यांच्या गाडीवर ११ हजार रुपयांचा दंड होता. तो त्यांनी जागेवरच वसूल सुद्ध केला आहे.आमदाराची गाडी आहे, असे सांगूनदेखील ते निघून गेले असते. पण पोलीसांप्रती असलेली आत्मियता दाखवत जागेवरच हा दंड भरला आणि पोलीसांना सहकार्य केले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये बहुतेक मोठ्या रस्त्यावर सध्या पोलीस गस्त घालत आहेत. विशेषतः लसीकरणाची माहिती घेण्यासाठी अनेक शहरांमध्ये पोलिसांनी चेक पोस्ट सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्ती सोबतच गाड्यांचीदेखील चौकशी केली जात आहे.

माजलगाव तालुक्यातील परभणी फाटा येथे विशेष मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्यानुसार माजलगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग झोनवाल, उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोह.प्रधान चालक इचके हे कारवाई करत होते. यावेळी एक फोर्च्युनर गाडी (एमएच-४४ ०००९) तिथून जाताना आडवली. यावेळी ती फोच्यूनर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्या नावावर असल्याचे समजले. व त्या गाडीवर ११ हजार रुपयांचा पेंडिंग दंड असल्याचे दिसले. यावेळी चालकाने अक्षय मुंदडा यांना संपर्क केला. यावर त्यांनी दंड भरा व पोलीसांना सहकार्य करा, असे सांगितले. दरम्यान चालकाने ११ रुपये दंड देखील भरला.

आमदार खासदारांच्या गाडीला दंड होत नसतो आणि झालेला दंड वसूल होईल का? याचा काही नेम नसतो. असंच यापूर्वी सर्वसामान्यांना वाटायचे निदान या प्रकरणात तरी आमदार महोदयांच्या गाडीवरील दंड पोलिसांना जागीच मिळाला. पोलीसांच्या कर्तव्याबद्दल दाखवलेल्या आत्मियतेबद्दल मुंदडा यांचे कौतूक होत आहे. तर पोलीसांनीही आमदारांची गाडी आडवून दंड वसूल करत कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे दाखवून दिले.

संबंधित पोस्ट