कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुलुंडचे प्रशासन सज्ज. प्रतिबंधक उपाय सुरू
- by Adarsh Maharashtra
- Apr 22, 2021
- 1363 views
मुलुंड:(शेखर भोसले) दि २२ एप्रिलच्या रात्रीपासून कडक लॉकडाऊनची घोषणा राज्यशासना कडून करण्यात आली असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला मुलुंडमधील अनेक ठिकाणी लोकांची व वाहनांची गर्दी होवू नये म्हणून मुलुंड पोलिस व पालिका प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना आखायला सुरुवात केली असल्याचे चित्र दिसत आहे. याच अनुषंगाने लोकांच्या व फेरीवाल्यांच्या गर्दीने नेहमीच गजबजलेले असलेले रस्ते, चौक, उद्याने, स्टेशन परिसर, मॉल परिसर तसेच वाहनांची गर्दी होणारी ठिकाणे येथे सुरक्षा बेरिकेड, बांबूचे बेरिकेड प्रशासनाकडून बसवण्यात येत आहेत़. विनाकारण फिरणाऱ्या लोकाची गर्दी नियंत्रणात ठेवून कोरोनाच्या फैलावाला अटकाव निर्माण व्हावा व लॉकडाऊन पूर्णतः यशस्वी व्हावा यासाठी मुलुंडचे पालिका प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील आरआरटी रोडवर भाजीमार्केट आहे. या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात त्यामुळे खरेदीसाठी तेथे नेहमीच ग्राहकांची व वाहनांची गर्दी होत असते. परंतु कोरोनाची रुग्णसंख्या मुलुंडमध्ये वाढत असताना व मिनी लॉकडाऊन काळात प्रशासनाने विनंती करूनही येथील फेरीवाल्यांनी, अन्नपदार्थ विक्रेत्यांनी तसेच त्यांच्याकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी स्वतःच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता गर्दी केल्यामुळे कोरोना आटोक्यात न येता फैलावत गेला व त्याचमुळे मुलुंड मधील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढती राहिली. आज रात्रीपासून होणाऱ्या कडक लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर दोन्ही बाजूने बांबूचे बेरिकेड बसवायला प्रशासनाने सुरुवात केली असून येथील फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, ग्राहक व वाहनांना त्यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत पूर्णपणे मज्जाव असणार आहे. तसेच प्रशासनाने मुलुंडमधील उद्यानांचे प्रवेशद्वार सर्व बाजूने बंद केले आहेत व तेथेही कडक पहारा बसवण्यात आला आहे. मुलुंड रेल्वे स्थानकात देखील पूर्व आणि पश्चिमेच्या बाजूने एकच प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे. स्थानक परिसरात देखील पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. गर्दी होणाऱ्या सर्व महत्वाच्या रस्त्यावर अश्याच प्रकारचे सुरक्षा बेरिकेड टाकण्यात आले असून ते सर्व रस्ते वाहनचालकांसाठी व बाहेरील नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत.
मुलुंड पोलिस व टी वार्ड पालिका प्रशासन गुरुवार दि २२ एप्रिल पासून होणाऱ्या कडक लॉक डाऊन साठी पूर्णपणे सज्ज झाल्याचे चित्र यावेळी दिसत असून महत्वाच्या नाक्यांवर, चौकात, रस्त्यांवर, स्टेशन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या साथीने पालिकेचे क्लीनअप मार्शल, पालिका कर्मचारी, अधिकारी व महसूल खात्याचे कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर व नियम मोडून दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम