रायगड बाईक्स फेस्टिवल" च्या माध्यमातून रस्ता सुरक्षा आणि पर्यटनविषयी संदेश देणारा उपक्रम अभिनंदनीय : जिल्हाधिकारी निधी चौधरी

बोरघर/माणगांव : "रायगड बाईक्स फेस्टिव्हल" च्या माध्यमातून समाजात रस्ता सुरक्षा व रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाविषयी संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय असून या माध्यमातून समाजात वाहतूक नियम व रस्ते सुरक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईलच, त्यातूनच जनजागृतीही होईल. त्याचबरोबर रायगड मधील पर्यटन  वृद्धीही जोमाने होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे केले.

अलिबाग येथे जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींच्या पुढाकारातून "रायगड बाईक्स फेस्टिवल" हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. आज या उपक्रमाला जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दूधे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे वाहतूक शाखेतील इतर अधिकारी कर्मचारी, प्रसाद चौलकर,शार्दुल भोईर,धनंजय साक्रूडकर, महेंद्र पाटील, केतन भगत कौस्तुभ पाटील, प्रवीण बोने, राजेश शिंदे यांची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध भागातून बाईक रायडर्स सहभागी झाले आहेत. अवघ्या साडेचार वर्षांचा चिमुकला कु.गंधार प्रसाद चौलकर हादेखील या उपक्रमात स्वतः हेल्मेट घालून सहभागी झाला होता. उपस्थित मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले.

जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या की, या बाईक  रायडर्सच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याची संस्कृती,पर्यटन याविषयीची माहिती राज्य तसेच देशाच्या विविध भागांमध्ये निश्चितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या बाईक रायडर्स मध्ये महिलांचाही लक्षणीय असा सहभाग आहे, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे हे द्योतक आहे. तसेच या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासनातील काही कर्मचारी देखील सहभागी असल्याचा मला अभिमान आहे.

भारतातून गोव्यामध्ये ज्याप्रमाणे दरवर्षी "रायडर मेनिया" हा महोत्सव आयोजित केला जातो, त्याच धर्तीवर रायगडमधील समुद्रकिनारी पर्यटन अधिक विकसित व्हावे, येथील लोकसंस्कृती सर्वदूरपर्यंत पोहोचावी आणि हे करीत असतानाच वाहतूक नियमांविषयी, रस्ते सुरक्षा या विषयांबाबत जनजागृती व्हावी, हा उद्देश "रायगड बाईक्स फेस्टिवल" आयोजित करण्यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या निमित्ताने पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनीही या "रायगड बाईक्स फेस्टीवल"ला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे सचिन काळे एस एस के, इनविक्टस्, महा ऑटो व्हिल्स, वेगा ईलेक्ट्राँनिक्स, राजू कांतीलाल जैन यांचे प्रायोजकत्व लाभले.

संबंधित पोस्ट