भररस्तात एसटी फेल होण्याचा अजब प्रकार चाकाचे नट-बोल्ट गायब झाल्याने प्रवाशांची हवा टाईट

डोंबिवली(प्रतिनिधी): रस्त्यावर चालत असताना एसटी बसमधून आवाज आल्यानंतर बस थांबवून जेव्हा पाहिले तेव्हा तर बसमधील एका चाकाचे सर्व नट-बोल्टच गायब होते. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांची हवा टाईट झाली होती. मात्र हा प्रकार वेळेवर माहिती पडल्याने मोठा अपघात टळला आहे. एकीकडे यामुळे बसेसची कशाप्रकारे देखरेख केली जाते, या घटनेमुळे समोर आले आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा निष्काळजीपणा यामुळे उघडकीस आला आहे.

कल्याण-शिळरोडवर असलेल्या डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यासमोर एसटीची एम एच 14/बी टी/4010 क्रमांकाची एक बस भररस्त्यात थांबली होती. कल्याणमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी त्या रस्त्यावरुन जात असताना त्यांची नजर या बसवर पडली. चालक आणि वाहकाला विचारपूस केली असता अजब माहिती मिळाली. बसमधील एका टायरचे नट-बोल्ट गायब असल्याचे आढळून आहे. हा प्रकार समजताच बसमधील जवळपास 30-32 प्रवाशांना उतरविण्यात आले आणि बस दुरुस्तीसाठी कल्याण बस आगाराला संपर्क करण्यात आला. योगेश दळवी यांनी बसचा व्हिडीओ काढला. नट-बोल्ट कसे पडले ? याबद्दल कुणालाही काही सांगता येत नव्हते. मात्र एवढे सदर बस डेपोमधून निघताना बसची चाचणी केली नव्हती. हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असून शासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी योगेश दळवी यांनी केली आहे. सदर बसची पाटी पेण-जळगाव, तर ही बस पेण आगाराची असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या बाबत कल्याण बस डेपोचे मॅनेजर विजय गायकवाड यांनी सांगितले की, ही बस पनवेल डेपोची आहे. सदर कल्याण-मुरुड मार्गावर चालणारी आहे. बसच्या दुरुस्तीचे काम कल्याण डेपोमध्ये सुरु आहे. मात्र या प्रकरणी त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

संबंधित पोस्ट