डोंबिवलीत आणखी एका पेढीकडून फसवणूक,फसगत झालेल्यांसाठी मनसे करणार आंदोलन

डोंबिवली :(प्रतिनिधी) सर्वसामान्यांना जवळपास 15 कोटी रुपयाचा गंडा घालणाऱ्या प्रथमेश ज्वेलर्सच्या अजित कोठारीकडून लायसन्स नसताना बँकेप्रमाणे ठेवी घेऊन फसविण्याचा प्रकार या पूर्वी घडला होता. त्यानंतर गुडविन ज्वेलर्सचे सुनीलकुमार, सुधेशकुमार आणि व्यवस्थापक (मॅनेजर) मनीष कुंडी या ठकसेनांनी 69 गुंतवणूकदारांना जवळपास 3 कोटी 87 लाखांचा चुना लावल्याचे उघडकीस आले होते. अश्याच प्रकारे व्ही. जी. एन. नामक ज्वेलर्सकडूनही सर्वसामान्य नागरिकांना फसविण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर मनसे तर्फे येत्या शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी पोलिसांशी पत्रव्यवहार करून आंदोलनाची तयारी केली आहे. डोंबिवली ही मध्यमवर्गीय आणि सुशिक्षितांची नगरी आहे. शहरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यापैकी काही लोक सत्य परिस्थितीचा विचार न करता झगमगीच्या वातावरणाला बळी देखील पडत आहेत. त्यानुसारच व्ही. जी. एन. ज्वेलर्स दुकानदाराने डोंबिवलीतील भाबड्या मध्यमवर्गीय नागरिकांना भिशीद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून फसविण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीत अनेक सेवानिवृत्त नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाच्या भवितव्याची व्यवस्था, मुला-बाळांचे लग्नकार्य, मुलांचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी या ज्वेलर्सवर विश्वास ठेवला. त्याच्याकडे विविध योजनांद्वारे भिशीमध्ये गुंतवणूक केली. परंतु काही दिवसांपूर्वी या ज्वेलरने परताव्याच्या रकमेसाठी नंतर या...अशी उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या स्टाफला जाब विचारण्यासाठी सदर दुकानासमोर मोठ्या संख्येने देखील जमू लागले. आपल्या परताव्याच्या रकमेचे काय होणार ? या बद्दल गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दुकानातील संबंधित कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता नागरिकांना सेवा देण्यासाठी बसलेल्या महिला उद्धटपणे दादागिरीच्या भाषेत बोलून गुंतवणकदारांचा अपमान करत असतात. पोलिसांना सांगून तुमची वाट लावू, अशाही धमक्याही देण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाला आहे. यातील अनेक गुंतवणूकदारांनी मनसेकडे धाव घेऊन व्यथा मांडल्या. या ज्वेलर्सला त्याची जागा दाखविण्यासाठी, संबंधित दुकानाच्या मालक किंवा संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी, तसेच गुंतवणूकदारांना त्यांचे परतावे परत मिळवून देण्याकरिता गुरुवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मनसे ठिय्या मांडणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद रोडला असलेल्या या दुकानासमोर होणाऱ्या आंदोलनादरम्यान वाहतूकीस कोणताही अडथळा येणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचेल, असे कोणतेही कृत्य मनसैनिकांकडून होणार नसल्याची ग्वाही शहराध्यक्ष मनोज घरत यांनी पोलिसांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

संबंधित पोस्ट