महाराष्ट्र हे पर्यटनाचे "ग्रोथ इंजिन" - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा ; असोसिएशनकडून पर्यटन मंत्री ठाकरे यांचा सत्कार
- by Adarsh Maharashtra
- Feb 03, 2021
- 674 views
मुंबई, दि, 2 : महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करुन महाराष्ट्र हे पर्यटनाचे "ग्रोथ इंजिन" बनले आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांनी केले.
पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित असलेल्या आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याबद्दल फेडरेशन ऑफ हॉटेल ॲण्ड रेस्टाँरंट असोसिएशन ऑफ इंडिया, हॉटेल ॲण्ड रेस्टाँरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एफएचआरएआय चे उपाध्यक्ष गुरबक्सीश सिंह कोहली, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, एचआयएचे अध्यक्ष श्री.भाटीया, श्री.चटवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार समारंभाला उत्तर देताना पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोविड महामारीच्या काळात हॉटेल व्यवसायीकांनी मोलाची कामगिरी केली आहे. डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामॅडीकल स्टाफ हे सातत्याने संकटाला तोंड देत होते. अशावेळी त्यांना सोईसुविधा देऊन त्यांच्या निवासाची 'अतिथी देवो भव' या निस्वार्थी भावनेने हॉटेल असोसिएशनने सहकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे आणि पर्यटन क्षेत्र बंद असताना त्यांना चालना देण्यासंदर्भात शासन स्तरावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यातून पर्यटन विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देवून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना देता येईल यावर एकमत झाले. लॉकडाऊन नंतर राज्याच्या मिशन बिगीन या संकल्पनेंतर्गत ही चांगली सुरुवात होत आहे. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा हॉटेल उद्योगासाठी लाभदायक ठरणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अधिक सुलभरितीने मिळण्यासाठी 'सिंगल स्टॉप' 'डेस्क' ही संकल्पना सुरु करण्याचा विचार शासन करीत असून परवाने प्राप्तीसाठी ही संकल्पना प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला.
श्री.ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटनवृद्धीच्या अनेक संधी असून पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग यांच्या सहकार्याने चांगले पर्यटन स्थळ विकसित करण्याचे काम चालू आहे. कोविड-19 नंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईसारख्या महानगरांमध्ये आठवड्याचे सात दिवस, 24 तास सेवा उपलब्ध करण्याची परवानगी देण्यात आली. शासन पर्यटन क्षेत्राला आणि त्याच्या विकासाला नेहमी प्राधान्यक्रम देत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम चालू आहे. संधीचा उपयोग करुन महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. हॉस्पीटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करु. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकतेच बृन्हमुंबई महानगरपालिकेत हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरु केली आहे. त्याप्रमाणे आगामी काळात व्हिंटेज कार म्यूझियम, वॉकींग टूर, गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभिकरण अशा विविध संकल्पना आगामी काळात राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम