कुंर्झे आदिवासी सहकारी संस्थेच्या सचिवासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

▪️1 कोटी 31 लाखाचा अपहार झाल्याचा आरोप

पालघर:(प्रतिनिधी) विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव बाबुराव वाजे यांनी शेतकरी सभासदांना रब्बी व खरीप पिक कर्ज व इतर वाटप केलेल्या वसुलीत 1 कोटी 31 लाख 57 हजार 235 रूपयांचा अपहार करून संस्थेचे सभासद व दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विक्रमगड यांची फसवणूक केल्याची लेखापरीक्षणात उघड झाल्याने संस्थेचे सचिव व जबाबदार असलेले संचालक मंडळावर व बँक तपासणी यांच्यावर 7 जानेवारी 2021 रोजी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कुंर्झे या संस्थेत 942 सभासद असून या संस्थे मार्फत सभासदांना दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पिक कर्ज वाटप केले जाते. संस्थे मार्फत कर्जाचे वाटप करतांना सर्व संचालक मंडळ यांचे संमतीनेच कर्ज वाटप केेले जाते व त्याला सर्व संचालक मंडळ हे जबाबदार असतात. सन 1990 पासून ते दि. 15 /08/ 2014 पर्यंत या संस्थेचे सचिव म्हणून बाबुराव वाजे हे कार्यरत असतांना त्यांनी वाटप केलेले कर्ज हे सभासदांकडून वसुल करून घेवून त्याची वसुली नोंद संस्थेच्या कॅशबुकला करणे आवश्यक असतांना त्यांची नोंद कॅशबुकला न घेता रक्कम रू. 25,35,469/ हे वैयक्तिक खतावणीला कर्ज खात्यामध्ये जमा पावती नंबर व रक्कम नोंदवून कर्ज परस्पर जमा दाखवून कर्ज खाती निरंक केल्याचे दर्शविले, तर जमा पावत्या नुसार रक्कमा संस्थेच्या व्यवहारात कमी जास्त प्रमाणात वसुली रक्कम रू. 5,13,587/ बाबत कर्जदाराच्या वैयक्तिक खतावणीला कर्ज वाटप दाखवून सदर खात्यावर सभासदांकडू कमी/जास्त वसुली घेऊन सभासद खाते निरंक करून नविन कर्ज वाटप करण्यात आले,  संस्थेच्या व्यवहारात त्या त्या आर्थिक वर्षात सहाय्यक खतावणी व रोजकिर्दीत  जमा न घेता रूपये 90,02,735/ एवढे कर्ज निरंक केल्याचे दाखवण्यात आले आहे, लेखापरिक्षण च्या वेळी तपासणीमध्ये सन 2008-2009 मध्ये रोजकिर्दमध्ये नमुद प्रमाणे दि. 31/03/2009 रोजीच्या रोजकिर्द पान क्र. 61 पावती क्रमांक 201 ते 2007 वर सफेद शाईचा वापर करून जमा रक्कम रूपये 1,12,195/  हे व्यवहार रद्द केल्याचे वा जमा केल्याचे दिसून आले आहे. सन 2013-2014 या वर्षातील जमा पावती कमी /जास्त रक्कम रोजकिर्दला व सहाय्यक खतावणीला रू. 2,36,783/ रूपये जमा घेतलेले नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. सभासदांनी बँकेत परस्पर भरणा केलेली रक्कम संस्थेच्या किर्दला जमा न घेता बँक भरणा दर्शवून रोख रक्कम रूपये 4,51,655/ ने शिल्लक घटवली आहे. तर दिपक आरज हे सहसचिव असतांना कर्ज वसुली येणेवर रूपये 1,14,560/ बाकी आहे, तसेच बाबुराव माधव वाजे हे संस्थेचे सचिव असतांना शिल्लक फरक रूपये 1,59,219/ येणे बाकी आहे. तसेच खावटी किर्द शिल्लक येणेवर रू. 31,032/ बाकी आहेत हे लेखापरिक्षणात निदर्शनास आले आहे. यावरून संस्थेचे सचिव बाबुराव वाजे, सहाय्यक सचिव दिपक आरज, संचालक मंडळ, व बँक तपासणीस यांनी सन 2007-2008 ते सन 2015-2016 पर्यंत कुंर्झे आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित कुंर्झे संस्थेमध्ये कार्यरत असतांना सभासद कर्ज वसुलीचे जमाखर्च नोंदवून रोख शिल्लक रक्कमेचा अपहार करून, रोजकिर्दीत खाडाखोड करून, बोगस नोंदी करून , सदर संस्थेचे सचिव, सहाय्यक सचिव, संचालक मंडळ, व बँक तपासणीस यांनी त्यांचे वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी असतांना त्याचे पालन न करता  संस्थेचे सभासद व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची फसवणूक करून संस्थेचा व बँकेचा विश्वासघात करून एकूण रूपये 1,31,57,235/ या रक्कमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने लेखापरीक्षक यांनी संस्थेचे सन 2007 ते 2011 व सन 2011 ते 2016 पर्यंत कार्यरत असलेले तत्कालीन सचिव बाबुराव माधव वाजे, सहाय्यक सचिव दिपक जनार्दन आरज , संचालक मंडळ बच्चु गोपाळ ठाकरे ( सभापती),  जगदिश बाळकृष्ण शेलार ( उपसभापती), बबन विठु गायकवाड, वसंत महादेव लहांगे, सुभाष श्रीधर शेलार, बाबु सोमा डोळे, आत्माराम काकड्या डवला, एकनाथ बाळु आरज, शशिकांत हरिश्चंद्र श्रेयसकर, बुध्या छगन धोडी, पार्वती शंकर भोवरे, सरस्वती रघुनाथ चाबके , दिलीप परशुराम पाटील, राजू आत्माराम शेलार, प्रकाश सदु भुरकुड, दिपक भालचंद्र शेलार, शंकर केशव भोवरे, रघुनाथ जोतीराम पोळ, बाळु रामा आतकरी, कृष्णा माधव चाबके, विरू गोविंद धोडी, गिरजा च़ैत्या चिंमडा,व या कार्यकाळ कार्यरत असलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तपासणीस अशोक गणपत धुम हे बँक तपासणीस व शाखा व्यवस्थापक होते, बँक तपासणीस दिपक मगनराव लाड, विलास बाबु पाटील, भरत श्रीपाद जाखडी, विष्णू रघुनाथ तुंबडा, या संचालक मंडळ व बँक तपासणीस यांच्या विरूद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम 420, 406, 409, 465, 467, 468, 471, 34 सह महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 चे कलम 73(1) (अ) (ब) नुसार विक्रमगड पोलीस स्टेशन मध्ये 29 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावेळी कार्यरत असलेले सचिव बाबुराव माधव वाजे यांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट