माणगांव तालुक्यातील स्केटिंग चॅम्पियन्स सांगली येथे फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्काराने सन्मानित

बोरघर/माणगांव (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत माणगांव तालुक्यातील कुमार श्रेयस गमरे,अार्यन गमरे, आर्यन मोरे, अर्जुन मोहिते, रुद्राक्ष मोरे आणि अर्णव भेकरे या खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल त्यांना सांगली येथे फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरी मुळे त्यांनी माणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांनी रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्याचे आणि त्यांच्या मार्गदर्शक, तथा प्रशिक्षक क्रीडा शिक्षकांचे नाव रोशन करून जिल्ह्यासह तालुक्याची मान गर्वाने उंचावली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सदर पुरस्कार वितरणाच्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथील खरे सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी राज्यातील १५ शिक्षक, ७ क्रीडा शिक्षक, ४५ खेळाडू, २ संघटक यांची वर्णी लागली होती. या भव्य दिव्य अशा शानदार पुरस्कार वितरण कार्यक्रमात माननीय उपायुक्त सौ. स्मृती पाटील मॅडम, श्री. ओंकार शुक्ल, नगरसेवक श्री. विनायक सिंहासने यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याचे स्केटिंग चॅम्पियन्स कुमार श्रेयस गमरे, आर्यन गमरे, आर्यन मोरे, अर्जुन मोहिते, रुद्राक्ष मोरे या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत केलेल्या अव्वल कामगिरीमुळे आणि त्यामुळे त्यांना मिळालेल्या फिनिक्स राष्ट्रीय खेळरत्न पुरस्कारामुळे रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंवर समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छात्मक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित पोस्ट