कमी दिवसांत जास्त मिळवून देणारे कलिंगड पीक शेतकऱ्यांसाठी लाभदायक -कृषिभूषण अनिल पाटील

शेतकऱ्यांसाठी मोफत कलिंगड लागवड कार्यशाळेचे आयोजन

वाडा (प्रतिनिधी) निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणातील भात उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. येथील शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात कडधान्य बरोबरच काही नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. या नगदी पीकामध्ये कलिंगड हे कमी दिवसांत अधिक उत्पन्न देणारे पीक असुन येथील शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावे असे आवाहन कृषिभूषण शेतकरी अनिल  पाटील  यांनी केले आहे. तर गेली 35 वर्षे कलिंगड लागवड करून विक्रमी उत्पादन घेणारे अनिल पाटील हे कलिंगड लागवडी बाबत शेतकऱ्यांचे मोफत प्रशिक्षण घेत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

वाडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी कलिंगडाचे पीक घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी पारंपरिक पद्धत, वेळीअवेळी लागवड होत असल्याने कलिंगड पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना रोगराईमुळे मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. मात्र आता नव्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कलिंगडाची लागवड केली तर रोगराई न येता मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळून अधिक पैसे मिळत असल्याचा दावा कृषिभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी केला आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या अनिल पाटील यांच्या कामाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण देवून सन्मानित केले असून ते गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

                  लागवड पद्धत

सुकलेली जमीन नांगरून घ्यावी. योग्य अंतरावर स-या पाडून या स-यांना प्लास्टीकचे  (मल्चिंग) आवरण द्यावे. व  स-यांवर योग्य अंतरावर कलिंगडाचे तयार रोपांची लागवड करावी.

कलिंगडाच्या रोपांची नर्सरी अनिल पाटील यांनी बनवून ही रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. विशेषतः जे शेतकरी या नर्सरीमधून कलिंगडाचे रोप नेऊन या पिकाची लागवड करतात अश्या शेतकऱ्यांना पाटील हे  विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत. तसेच दर शनिवारी सांगे ता. वाडा, येथे कलिंगड लागवड करणा-या शेतक-यांसाठी शेतावरच सकाळी 9 ते 10  ह्या वेळेत  या पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.  नोव्हेंबर ते जानेवारी हा कलिंगड लागवडीसाठी योग्य कालावधी साठी असून या पिकाची टप्प्याने लागवड करणे सोयीचे ठरते

                    प्रशिक्षण

जमिनीची मशागत व पूर्व तयारी, बेड किंवा उंच सरी कसे बनवावी, ठिबक सिंचन कोणती वापरावी, लागवड कशी करावी,  रोप किंवा बी कसे लावावे, खते व औषधे ह्यांचा वापर कसा करावा, पीक वाढीच्या वेळेस काय खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात येते.

अवघ्या 70 ते 80 दिवसांच्या कलिंगड पीकासाठी एकरी 30 हजार रुपये खर्च येतो व 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कमी दिवसांत अधिक पैसे मिळवून देणा-या या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे.

अनिल पाटील - कृषिभूषण शेतकरी, सांगे, ता. वाडा.

संबंधित पोस्ट