मुहूर्त ठरला! १७ ऑक्टोबरला एकनाथ खडसेंकडून राजकीय घटाची पुनर्स्थापना ? तर हातात बांधणार घड्याळ?

भाजपाला धक्का बसणार;आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार

तर मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; एकनाथ खडसेंना कृषीखात्याची जबाबदारी देण्याची शक्यता?

मुंबई :भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासमवेत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. त्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता.त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे. खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस मी सुद्धा उपस्थित होतो.राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात लवकरच पत्रकाराना माहिती देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांच्या कार्यक्रमाला खडसे गैरहजर

जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उभारलेल्या हॉस्पिटलचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र या कार्यक्रमास एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांच्या स्रुषा खा. रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. खडसे यांच्या गैरहजेरीची चर्चा सुरू आहे.

फडणवीस म्हणतात... खडसे पक्षांतर करणार नाहीत

एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जामनेर येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, या कार्यक्रमाला खडसे यांनी अपेक्षेप्रमाणे गैरहजर राहिले तर खासदार सुनबाई व समर्थकांनी मात्र उपस्थिती दिली. खडसे यांच्याशी दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; एकनाथ खडसेंना कृषीखात्याची जबाबदारी?

आघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा सुरू असताना आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही खात्यांची अदलाबदल, तर काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करून एखाद्या विद्यमान मंत्र्याला डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांच्याकडे कृषीखात्याची जबाबदारी देण्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे जाणार असून त्याबदल्यात शिवसेनेकडे असलेल्या कृषी खात्यासह आणखी एखादे खाते राष्ट्रवादीला दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.या दोन खात्यांसह रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार, अल्पसंख्यांक कल्याण या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याचे सांगण्यात आले.राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्याची चर्चा असून हे नवे चेहरे कोण असतील याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. राज्य सरकार अस्थिर असून ते केव्हाही कोसळू शकते, असे भाजपकडून वारंवार सांगितले जात असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खांदेपालटाचा घाट घातला आहे.

जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष?

राष्ट्रवादीकडील गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेल्यास या खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पक्षकार्यासाठी जुंपले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आव्हाड हे राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा मानले जातात. भाजपावर हल्ला करण्यासाठी आव्हाड यांचा उपयोग करून घेतला जाईल. शिवाय सोशल इंजिनिअरिंग साधले जाईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केला.गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेल्यास ते कुणाकडे दिले जाणार याबद्दल उत्सुकता आहे. येत्या दोन वर्षांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे हे खाते मुंबईतील एखाद्या नेत्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.

१२ आमदारांच्या दोन दिवसात नियुक्त्या?

विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त बारा जागांच्या रखडलेल्या नियुक्त्या याच आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यात भाजपा नेते एकनाथ खडसे यांचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार्‍या जागांपैकी एका जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले जाणार आहे. याशिवाय एक महिला नेत्या या आमदारकी साठी इच्छुक आहेत.

शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत इच्छुकांची प्रचंड गर्दी असून जोरदार लॉबिंग दोन्ही पक्षात सुरू आहे. येत्या दोन दिवसात बारा नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार असून त्यानंतर राजकारणाला आणखी वेगळे वळण लागेल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्याने बोलताना केला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट