कल्याण अँटी रॉबरी सेलकडून सराईत बाईकचोर गजाआड; 8 महागड्या बाईक हस्तगत

कल्याण दि.21ऑगस्ट: महागड्या बाईक  चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असणाऱ्या एका सराईत चोराला कल्याण अँटी रॉबरी सेल कडून अटक करण्यात आली आहे. हैदर अक्रम इराणी (वय 30 वर्षे) असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून 8 बाईकही हस्तगत करण्यात आल्या आहेत.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशननजीक असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहणाऱ्या हैदर इराणीवर 6 ऑगस्ट रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अँटी रॉबरी स्कॉडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे आणि त्यांचे पथक हैदरच्या शोधात होते. दरम्यान हैदर आंबिवलीच्या इराणी वस्तीत येणार असल्याची माहिती अँटी रॉबरी स्कॉडला मिळाली होती. त्यानूसार अविनाश पाळदे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून हैदरच्या मुसक्या आवळल्या. पोलीस चौकशीमध्ये त्याच्याकडून 4 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाक्या आणि 1 मोबाईल हस्तगत करण्यात आला.

या कुख्यात चोरट्याविरोधात शांतीनगर, खडकपाडा, उल्हासनगर, कोळसेवाडी, कल्याण तालुका (टिटवाळा) सह मुंबईतील पंतनगर पोलिस ठाण्यात बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हैदर हा सराईत चेन स्नॅचर असून त्याच्यावर नाशिक, पुणे, ठाणे येथे 14 जबरी चोरीचे गुन्हेही दाखल असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

संबंधित पोस्ट